उमेदवारीसाठी चुरस पण निवडणूक मात्र सहज सोपी होण्याची शक्यता
पुणे – हडपसर विधानसभा मतदार संघात आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मोठ्या हालचालींना प्रारंभ झाला आहे.या मतदार संघात अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने जोरदार उसळी घेत हालचाली सुरु केल्याने अजितदादा गट हडपसर मध्ये निष्प्रभ ठरतो कि काय ? असा प्रश्न निर्माण होतो आहे. विद्यमान आमदार चेतन तुपे पाटील हे त्यांचे स्वर्गीय पिताजी विठ्ठलराव तुपे पाटील यांच्या नावाने,कार्याने राजकारणात दाखल झाले,स्वतः ते हुशार आहेत,पण जनमानसात प्रतिमा असलेले ग्रास रूट ला काम करत आलेले शिंदे गटाचे नाना भानगिरे यांचे मोठे आव्हान त्यांना आता उमेदवारी मिळविताना पेलवणे सुसह्य होणार काय ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
निवडणुका लढविताना ग्रास रूट वर,जनमानसात मिसळणारे,आणि त्यांना मदत करण्याची दानत असलेले व्यक्तित्व महत्वाचे मानले जाते.शिंदे यांच्या शिवसेनेचे नाना भानगिरे याच आपल्या गुणांवर बाजी मारून जाऊ असे सांगत आहेत.तर तुपे पाटलांचे समर्थक मात्र पाटील उच्चशिक्षित आहेत आणि हुशार आहेत,सभागृहात ते अभ्यासपूर्ण विवेचन करत आले आहेत या त्यांच्या गुणांची निश्चित पुन्हा कदर केली जाईल असे सांगत आहेत.तिसरीकडे भाजपने योगेश टिळेकर यांचे विधान परिषदेवर पुनर्वसन करून या मतदार संघातून आपला हाथ काढून घेतला आहे आणि महाविकास आघाडीतून ठाकरे यांच्या शिवसेनेतून माजी आमदार महादेव बाबर जे कट्टर शिवसैनिक आहेत यांनीही आपला उमेदवारीसाठी दावा सांगितला आहे.शिवरकर कॉंग्रेसकडून प्रयत्नशील राहतील असे दिसते आहे.पण महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हा मतदार संघ शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोडण्यात येतो कि खासदार झालेल्या अमोल कोल्हे यांच्या तुतारी चिन्ह असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडण्यात येतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.तुतारी कडून माजी महापौर असलेले प्रशांत जगताप आपली मोट बांधून तयार आहेत.
महायुतीत चेतन तुपे पाटील कि नाना भानगिरे हा सवाल असताना महाविकास आघाडीतून देखील ठाकरेंची शिवसेना कि शरद पवारांची राष्ट्रवादी अशी शर्यत दिसून येणार आहे. अर्थात मविआतील शिवसेनेकडे ठाकरेंचे समर्थक बाबर आणि आता सिंघमचा बाप अशी प्रतिमा बनवत शंभर गाड्यांचा ताफा घेऊन मातोश्रीवर धडक मारून शिवसेनेत पुन्हा प्रवेश केलेले वसंत मोरे असे २ पर्याय आहेत.शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे उमेदवारीसाठी अमोल कोल्हे यांचे मत महत्वाचे मानले जाणार आहे.ते प्रशांत जगताप यांच्यासाठी अनुकूल असल्याचे सध्या दिसत असले तरी योगेश ससाणे देखील आपण रिंगणात असल्याच्या डरकाळ्या स्थानिक माध्यमातून फोडताना दिसत आहेत.त्यामुळे हडपसर मतदार संघ मविआ नेमका कोणत्या पक्षासाठी सोडणार ? शरद पवारांची राष्ट्रवादी कि ठाकरेंची शिवसेना यावर बरेचसे अवलंबून आहे.आणि महायुती हा मतदार संघ एकनाथ शिंदेंची शिवसेना कि अजितदादांची राष्ट्रवादीला येथे संधी देणार या दोन प्रश्नांवर येथील लढत अवलंबून आहे.दोघांनी शिवसेनेला सोडला तर नाना भानगिरे विरुद्ध महादेव बाबर किंवा मोरे अशा लढतीत मतदार कोणाला साथ देतील हे लोक सांगतील.आणि दोघांनी राष्ट्रवादीला सोडला तर चेतन तुपे पाटील विरुद्ध प्रशांत जगताप यातही मतदार कोणाला साथ देतील हे लोक सांगतील.पण काहीही झाले तरी येथे उमेदवारी साठी चुरस होईल पण निवडणुकीत चुरस होईल असे आता तरी वाटत नाही हे मात्र निश्चित.
SHARAD LONKAR