पुणे-छत्रपती संभाजीनगर येथील अाठ ते दहा बड्या व्यावसायिकांवर सलग पाच दिवस छापे टाकत पुणे आयकर अन्वेषण विभागाने त्यांचे सुमारे १३०० काेटींचे बेहिशेबी व्यवहार उघडकीस अाणले आहेत. सहा काेटींची राेकड व चार काेटींचे दागिने, माैल्यवान हिरे या चीजवस्तू जप्त करण्यात आल्या. अायकर चुकविण्यासाठी माेठ्या प्रमाणात राेखीने व्यवहार करत इतर छाेटे व्यावसायिक व ग्राहकांची दिशाभूल केल्याच्या संशयावरून ३० नाेव्हेंबरपासून ते ४ डिसेंबरपर्यंत हे छापे टाकण्यात आले.
गेल्या आठवड्यात गुरुवारी (३० नोव्हेंबर) सकाळी सहाच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरमधील आठ ते दहा बडे व्यावसायिक झाेपेत असतानाच त्यांच्या निवासस्थानी व कार्यालयांवर एकाच वेळी छापे टाकण्यात अाले. पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक व छत्रपती संभाजीनगरमधील आयकर अन्वेषण विभागाच्या ३०० ते ३५० अधिकाऱ्यांनी तपासणी सुरू केली. बहुतांशी अधिकाऱ्यांनी खासगी वाहनांमध्ये येऊन विविध क्षेत्रातील व्यावसायिकांच्या घर आणि कार्यालयांची झडती घेतली होती.
एसीमध्ये पेनड्राइव्ह; कचरा डब्यात दस्तऐवजएका व्यावसायिकाच्या कार्यालयातील दाेन महिला दुपारी अचानक घरी निघून गेल्या. पथकाला संशय आल्याने त्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. रात्री या महिलांच्या कार्यालयातील एका बड्या अधिकाऱ्याने त्यांच्या घरी जाऊन काही कागदपत्रे असलेली पिशवी व इतर साहित्य दिले. मात्र, पथकाने लगेच त्यांच्या घराची तपासणी केली नाही. तिसऱ्या दिवशी रात्री अचानक पथक या महिलांच्या घरी पाेहाेचले. सर्व घराची कसून तपासणी केली. हाती काही लागत नव्हते. अखेर घरातील फ्रीजखालून व बाहेर जिन्यातील कचऱ्याचा डबा व कागदी खाेके बाजूला केले असता त्याखालून कागदपत्रांनी भरलेली एक माेठी कापडी पिशवी मिळाली. त्यातूनच जवळपास १०० काेटींचे व्यवहार समाेर अाले. दुसऱ्या एका कर्मचाऱ्याच्या घराचीही कसून तपासणी केली. पथकही चांगलेच कसलेले होते. त्यांना एसीचा एक फ्लॅप उघडा दिसला. तो खोलताच तिथूनही हार्डडिस्क व पेनड्राइव्ह जप्त करण्यात आले.
कर चुकविण्यासाठी राेखीनेच व्यवहार :
उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, जमीन खरेदी-विक्री व्यावसायिक, कापड व्यापाऱ्यांवर छापे टाकण्यात आले. प्रत्येकाकडून दहा-दहा कापडी पिशव्या भरुन २० किलाे वजनाइतकी कागदपत्रे जप्त करण्यात अाली. कर चुकवण्यासाठी सर्व रोखीनेच व्यवहार करत होते. या व्यवहारांच्या पावत्या, बिले, ग्राहक कंपन्या, पुरवठादारांची नावे, रक्कम लिहिलेली कागदपत्रे जप्त करण्यात आली.
एका कापड व्यावसायिकाच्या कार्यालयात दिवसभर तळ ठाेकूनही पथकाला माहिती मिळत नव्हती. एक कर्मचारीच व्यवहाराची माहिती देत हाेता. पण, राेखीचे व्यवहारच नसल्याचे सांगून कागदपत्रे दाखवताना माेजक्याच फाइल अाणून दाखवत हाेता. पथकाची त्याच्यावरच नजर होती. रात्री उशिरा त्याने अधिकाऱ्यांची नजर चुकवून एक बॅग एका अालिशान कारच्या डिकीत ठेवली. मालकाला घरी साेडण्याचे कारण देत ताे निघाला. पथकाने त्याचा पाठलाग सुरू केला. त्याने क्रांती चाैकातून वेगवेगळ्या मार्गांनी गाडी चालवत मालकाला घरी साेडले. पथक मागे असल्याचे लक्षात अाल्याने तिथून ताे पुन्हा पुढच्या रस्त्याने निघाला. पथकाची दिशाभूल करण्यासाठी गल्लीबाेळातून जात घराजवळ गाडी लावून तो पायी निघाला. पथकाला संशय आला व ते थेट त्या मालकाच्या घरी पोहोचले. तेव्हा कर्मचाऱ्याचे सोंग घेणारा तो त्या व्यावसायिकाचा बंधूच निघाला.