विज्ञान भारतीच्या सहाव्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन
पुणे, ता. २२ : “विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगतीचे फायदे अधिकाधिक समाज घटकांपर्यंत कसे पोचतील, यासाठी प्रयत्न कार्याला हवेत. स्टार्टअप्समध्ये भारताने मोठी मजल मारली असली, तरी बौद्धिक संपदेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यात आपण पुरेसे गंभीर नाही. शिक्षण व संशोधन क्षेत्रासाठीची गुंतवणूक आणखी वाढविण्याची गरज आहे,” असे मत केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय करंदीकर यांनी व्यक्त केले.
विज्ञान भारतीच्या वतीने लोणी काळभोर येथील एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या प्रांगणातील विश्वशांती स्तूप येथे आयोजित सहाव्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रा. करंदीकर बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ संगणकतज्ञ डॉ. विजय भटकर, विज्ञान भारतीचे अध्यक्ष डॉ. शेखर मांडे, राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड, एमआयटी एडीटीचे प्रमुख डॉ. मंगेश कराड आदी उपस्थित होते. यावेळी अधिवेशनाच्या स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले.
प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “विज्ञान भारतीने सातत्याने समाजात वैज्ञानिक संस्कार रुजवण्याचे कार्य केले आहे. प्राचीन भारतीय परंपरेतील ऋषी हे त्या काळातील संशोधकच होते. आरोग्य, स्थापत्य, वास्तूनिर्माण, प्रशासन, औषधनिर्माण, शल्यचिकित्सा अशा कित्येक क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. आधुनिक काळातील भारतानेही अंतराळ संशोधन, क्षेपणास्त्रनिर्मिती, अणुविज्ञान क्षेत्रात प्रगतीची शिखरे गाठली आहेत. विकास, संशोधनाला विवेकाची जोड दिल्यानेच हे शक्य झाले आहे’.
डॉ. विजय भटकर यांनी ‘पिंडी ते ब्रह्मांडी’, या न्यायाने आपल्या आचरणात विज्ञाननिष्ठेचा स्वीकार केला, तर आपोआपच तो सार्वत्रिक होईल, असे मत मांडले. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नव्या दिशा, नव्या वाटांना भारतीय तत्त्वविचारांचा पाया मिळाला, तर स्वजागरणातून शाश्वत विकासाचा मार्ग शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. शेखर मांडे यांनी कोविड काळातील भारताची कामगिरी, चांद्रयान मोहीम आणि अयोध्येतील मंदिर निर्माण, या तीन उदाहरणांच्या माध्यमातून विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन आणि तत्त्वविचारांची पृष्ठभूमी भारताकडे असल्याने आपल्या संशोधक, शास्त्रज्ञांमध्ये स्वाभिमान आणि स्वकर्तृत्वावरील विश्वास कमालीचा उंचावल्याचे सांगितले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, “भारताची भूमिका मूळातच ज्ञानमय, विज्ञानमय आहे. सातत्याने विकासाकडे नेणारी अध्यात्मयात्रेची वैज्ञानिक प्रयोगशाळाच जणु आपल्या ऋषींनी, तत्त्वज्ञांनी आणि संतांनी शतकानुशतके उभारलेली आहे, जी विश्वकल्याणाचा संदेश देत सदैव पुढे जात राहील.”
डॉ. कौस्तुभ साखरे यांनी आभार मानले. डॉ. तृप्ता ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले. श्री. विवेकानंद यांनी संस्थेचा अहवाल सादर केला.
विचारवंत सुरेश सोनी यांचे बीजभाषण
‘समग्र विकासाची भारतीय संकल्पना व विज्ञान भारतीची भूमिका’ या विषयावर ज्येष्ठ विचारवंत सुरेश सोनी यांचे बीजभाषण झाले. ‘विकासाची संकल्पना अधिकाधिक अर्थपूर्ण करण्यासाठी जुनी व कालबाह्य प्रतिमाने टाकून दिली पाहिजेत. विज्ञान, तंत्रज्ञानाचे विवेकपूर्ण साह्य घेत, विश्वकल्याणाचा संदेश देणाऱ्या भारतीय तत्त्वज्ञानाचा अंगिकार केला, तरच जागतिक शांतता आणि सातत्यपूर्ण विकासाचे स्वप्न साकार होईल. विश्वकल्याणाची भावना आणि विज्ञान-तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार करण्याची गरज आहे.