कोथरूड, पर्वती, कसबा, पुणे कॅन्टोन्मेंट, वडगाव शेरी, हडपसर हे सहा विधानसभा मतदारसंघ मिळावे
पुणे- शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पुण्यातील विधानसभेच्या ६ जागांची मागणी केली असताना आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाही पुण्यातील विधानसभेच्या ६ जागा हव्या आहेत त्यासाठी पुण्याचे पक्षप्रमुख संजय मोरे यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
ते म्हणाले,’ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबई येथील शिवसेना भवन येथे काल शनिवार रोजी घेण्यात आली. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा आढावा सदर बैठकीत घेण्यात आला. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेसाठी कोणकोणत्या विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणे योग्य ठरेल, याविषयी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी या चर्चेत आपली मते मांडली. तसेच याविषयीचा अहवाल शिवसेना पुणे शहराच्या वतीने शिवसेना नेत्यांना सादर करण्यात आला.पुणे शहरामध्ये शिवसेनेची असलेली संघटनात्मक बांधणी आणि त्यायोगे पक्षाची पुणे शहरात वाढलेली ताकद व जनाधार याचा प्रामुख्याने विचार करून तसेच पूर्वी पुणे शहरांमध्ये शिवसेनेचे चार आमदार निवडून आलेले आहेत. सर्वसामान्य जनतेला शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींकडून असणारी विकास कामांची अपेक्षित खात्री आणि विश्वास. अशा अनेक जमेच्या बाजूंचा आढावा आठही विधानसभा क्षेत्रानुसार चर्चा करून घेण्यात आला. कोथरूड, पर्वती, कसबा, पुणे कॅन्टोन्मेंट, वडगाव शेरी, हडपसर हे सहा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळावे असे वरिष्ठांना दिलेल्या अहवालामध्ये नमूद केले आहे. बैठकीला पश्चिम महाराष्ट्र समन्वयक, शिवसेना उपनेते रवींद्रजी मिर्लेकर, शिवसेना उपनेते पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिनभाऊ अहिर, पुणे संपर्क संघटिका स्नेहल आंबेकर, शालिनी देशपांडे, सहसंपर्कप्रमुख आदित्यजी शिरोडकर, माजी आमदार महादेव बाबर, पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, जिल्हाप्रमुख शंकर मांडेकर, राजेंद्र काळे, विजय देशमुख, तसेच शिवसेना, महिला आघाडी, युवा सेना, युवती सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.