मुंबई – पुण्याची वाहतूक समस्या वर्षानुवर्षे आ वासून उभी आहे तुम्ही किती संथ गतीने कामे करणार आहात , मेट्रोचा विस्तार आणि रिंग रोड चे कामाला गती द्या फटाफट कामे करा अशा सूचना आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या .
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात प्रकल्प सनियंत्रण कक्षाची (प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनीट) बैठक पार पडली. नागरिकांना विकासकामांचा प्रत्यक्ष लाभ होण्यासाठी राज्यात सुरु असलेली, प्रगतीत असलेली आणि प्रस्तावित विकासकामे नियोजनानुसार ठरलेल्या वेळेत गतीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. राज्याचा दीर्घकालीन विकास डोळ्यासमोर ठेऊन राज्यभरात विविध विभागांमार्फत विकासकामे सुरु आहेत. नागरिकांच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील या सर्व विकासप्रकल्पांचा अजितदादांनी सविस्तर आढावा घेतला.पुणे मेट्रो क्रमांक तीनचं कामे तसेच नागरिकांच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या पुणे शहर आणि उपनगरांची वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी पुणे रिंग रोडचे काम वेगाने मार्गी लावण्याच्या सूचना अजितदादांनी अधिकाऱ्यांना केल्या. या कामासाठी आवश्यक असणारा निधी देण्यात येईल असंही अजितदादांनी सांगितलं. शिवाय सातारा येथे उभारण्यात येत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला गती देतानाच सातारा सैनिक स्कुलचे काम सुध्दा तातडीने मार्गी लावा असे निर्देशही त्यांनी दिल. कोकणाच्या पर्यटनाला चालना देणाऱ्या ‘रेवस ते रेडी’ किनारा महामार्गाला वेग देण्यासाठी प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावा असेही निर्देश अजितदादानी अधिकाऱ्यांना दिले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यावेळी अलिबागच्या उसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वडाळा येथील जीएसटी भवन, पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे, ‘सारथी’संस्थेचे पुण्यातील मुख्यालय, औंध, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अमरावतीतील ‘सारथी’च्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकाम, पुणे येथील कृषीभवन, शिक्षण आयुक्तालय, कामगार कल्याण भवन, सहकार भवन, नोंदणीभवन आदी प्रकल्पांच्या प्रगतीचा देखील आढावा घेतला.