नालेसफाईचा महापालिका प्रशासनाचा दावा फोल-कृती आराखडा करून तातडीने अंमलबजावणी करण्याची आमदार माधुरी मिसाळ यांची मागणी
पुणे-शनिवारी शहरात दोन तासांत झालेल्या पावसाने पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत केले. पर्वती मतदारसंघातील विविध भागांमध्ये पूर सदृश्य तिथे निर्माण झाली. घरांमध्ये, दुकानांमध्ये पाणी शिरले, रस्त्यांवर जणू काही नदी अवतरली, नागरिकांना वाहतुकीच्या कोंडीत अडकून राहावे लागले या परिस्थितीला महापालिका प्रशासन जबाबदार असून, प्रशासनाने नालेसफाईचा केलेल्या दावा फोल असल्याचा आरोप आमदार माधुरी मिसाळ यांनी केला.
प्रशासनाने उद्याच पर्वती भागातील नालेसफाईच्या कामाचा आढावा घेऊन कृती आराखडा तयार करावा आणि त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी मिसाळ यांनी आज आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन केली.
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत उद्याच पर्वती मतदारसंघातील नालेसफाईच्या कामाची पाहणी करण्याच्या सूचना आयुक्तांनी प्रशासनाला केल्या. त्याचा कृती आराखडा तयार करून पुढच्या पंधरा दिवसात अंमलबजावणी करण्यास सांगितले. ड्रेनेज लाईन साफ करणे, गाळ काढणे, कचरा काढणे, नाल्यातील राडाराडा उचलणे ही कामे तातडीने करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचे मिसाळ यांनी सांगितले.
मिसाळ म्हणाल्या, परवाच्या पावसामुळे पर्वती मतदारसंघातील वस्त्यांमध्ये, सोसायट्यांमध्ये, रस्त्यांवर पाणी शिरले. मार्केट यार्ड, सिंहगड रस्ता वाहतुकीसाठी बंद करावा लागला. 2019 मध्ये अशाच प्रकारची पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामध्ये आंबील ओढ्याला पूर येऊन निष्पाप नागरिकांचे बळी गेले. या परिसरातील सोसायट्यांचे मोठे नुकसान झाले. या सोसायट्यांच्या सीमा भिंती बांधण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यासाठी करण्यासाठी आमदार निधीतून मी निधी उपलब्ध करून दिला. परंतु महापालिका प्रशासनाने निधी दिला नाही. राज्य शासनाने नुकताच 200 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. कोणत्याही तांत्रिक बाबींमध्ये न अडता सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी ही मिसाळ यांनी केली.
रवींद्र बिनवडे ( अतिरिक्त महापालिका आयुक्त ) , पी बी पृथ्वीराज ( अतिरिक्त महापालिका आयुक्त ) श्री अशोक घोरपडे ( उद्यान अधीक्षक ) दिनकर गोजारी ( अधीक्षक अभियंता ) संतोष तांदळे ( अधीक्षक अभियंता ) ललित बेंद्रे ( उपअभियंता ) सुनील अहिरे ( उपअभियंता ) यांच्यासह पर्वती मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक उपस्थित होते. माजी नगरसेवक श्रीकांत जगताप, महेश वाबळे , रघुनाथ गौडा , प्रवीण चोरबोले, मानसी देशपांडे , राजश्री शिळीमकर , अनुसया चव्हान, मंजुषा नागपुरे , प्रशांत दिवेकर ,अजय भोकरे प्रशांत थोपटे विनया बहुलीकर, भीमराव साठे, राजू कदम यांचा समावेश होता.