
शेवाळेवाडी डेपो येथे आवश्यक सुविधा, पोलिसांकडून मिळणारे सहकार्य, पुणे मनपाकडून अपेक्षित मदत यावर या सर्वांशी चर्चा केली . यावेळी पोलीस निरीक्षक मंगला मोढवे मॅडम, पोलीस निरीक्षक खांदे साहेब, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे, डेपो मॅनेजर गायकवाड, डॉ. शंतनु जगदाळे, अमर तुपे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
पुणे-सोलापूर रस्त्यावरील हडपसर भागातील भाजी मंडई, गाडीतळ, आकाशवाणी, मगर पट्टा या भागात खासगी ट्रॅव्हल्स बस उभ्या राहात असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणारे वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना चांगला त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हडपसर मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे खासगी ट्रॅव्हल्स बसला रस्त्याच्या मधे न थांबता शेवाळेवाडी येथे थांबण्याच्या सूचना देत वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. सोलापूर महामार्गावरून हडपसरभागात जड वाहनांची मोठी वाहतूक आहे. त्यात खासगी ट्रॅव्हल्स बस मगरपट्टा ते आकाशवाणीपर्यंत प्रवाशांना सेवा देण्यासाठी भर रस्त्यात बस उभ्या करतात. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. यावर कायमस्वरूपी मार्ग काढण्याची मागणी नागरिकांनी केली होती. त्यावर पुणे वाहतूक पोलिसांनी पर्याय शोधून खासगी ट्रॅव्हल्स बसचालकांना शेवाळेवाडी येथील पीएमपी प्रशासनाची जागा भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यानंतर आता खासगी ट्रॅव्हल्स बस रस्त्यात उभ्या न करता थेट शेवाळेवाडी येथे थांबविण्यात याव्या, अशा सूचना दिल्या जात होत्या. आता या भागात खासगी बस थांबणार नसल्याने वाहतूक कोंडीतून वाहनचालकांची सुटका होणार आहे.

सोलापूर रस्त्यावरील हडपसर भागात मोठी बाजारपेठ आहे. या बाजार पेठेत खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. सोलापूर हायवेलगत मोठ्या प्रमाणात कपड्यांची दुकाने आहेत. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणारेदेखील नागरिकांची गर्दी बघून खरेदीसाठी येतात. त्यामुळे रस्त्यावर वाहने लावली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. त्यात या रस्त्यावरून सोलापूरसह इतर जिल्ह्यात जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स बसची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. त्यामुळे प्रवासी संख्यादेखील चांगलीच असते. या प्रवाशांसाठी या बस रस्त्यावरच थांबत असल्याने वाहतूक कोंडी प्रमाणात होते. त्यामुळे संध्याकाळी सात वाजल्यापासून वाहनांच्या रांगा लागतात.

पाहणी झाल्यानंतर हडपसर, मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे यांना कॉल करून तिथे आवश्यक असणारे मात्र बंद पडलेले विद्युत खांबाचे प्रकशदिवे सुरू करण्यास सांगितले. व आवश्यक अशा सर्व सुधारणा करण्यास सांगितले. त्या शक्य तितक्या लवकर होतील.