भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम
पुणे ः
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘अंतरंग’ या कथक नृत्य सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन शनीवार,दि. ८ जून २०२४ रोजी करण्यात आले होते. ज्येष्ठ नृत्यांगना आणि ‘ नृत्यधाम स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् ‘ च्या संचालिका प्रेरणा देशपांडे यांच्या शिष्या अवंती दातार आणि कल्याणी गोखले यांनी बहारदार एकल (सोलो) कथक नृत्य सादर केले.या सादरीकरणाला उपस्थित पुणेकर रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमात कथक नृत्याची पारंपारिक ताल प्रस्तुती व भावअंग सादर करण्यात आले.अवंती दातार यांनी राग भैरवीतील वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात केली.ताल तीन ताल मधील पारंपारिक रचना थाट,आमद, परन ,तिहाई या पारंपारिक रचना सादर केल्या. यानंतर राग तिलक कामोद मधील अभिनय मध्ये कजरी ‘सावन की ऋतु आयी रे सजनिया , प्रीतम घर नही आए ‘ ही रचना सादर केली. राग मारवा मधील चतरंगने त्यांनी समारोप केला.
कल्याणी गोखले यांनी कृष्ण वंदनेने सुरुवात केली. ताल पंचम सवारी मधे पारंपारिक रचना सादर केल्या.चक्रदार परन ,नौ की गिनती,अभिनय मध्ये ठुमरी ‘ काहे रोकत डगर मेरी नंदलाल ‘ सादर केली. नटभैरव रागातील तराना ने ‘ अंतरंग ‘ नृत्य प्रस्तुतीचा समारोप झाला.तालयोगी सुरेश तळवलकर,ज्येष्ठ तबलावादक रामदास पळसुले , प्रेरणा देशपांडे आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. ईशान परांजपे ( तबला ), कृष्णा साळुंखे ( पखवाज ) ,शुभम खंडाळकर (गायन ), यशवंत थिटे (हार्मोनिअम ) ,ईश्वरी देशपांडे (पढंत ) यांनी साथसंगत केली. निवेदन मुग्धा हसबनीस यांनी केले.
हा कार्यक्रम शनिवार, दि.८ जून २०२४ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला.हा कार्यक्रम विनामूल्य होता.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा २१० वा कार्यक्रम होता. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी कलाकारांचा सत्कार केला.