नवी दिल्ली-
नरेंद्र मोदी रविवारी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीचे 5 नवनिर्वाचित खासदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. यात छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार संदिपान भुमरे यांचाही समावेश असल्याचा दावा केला जात आहे.
लोकसभा निवडणुकीत केंद्रात भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. मोदी रविवारी आयोजित एका भव्य समारंभात सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. त्यांच्यासोबत एनडीएतील घटकपक्षांचे अनेक नेतेही मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, नरेंद्र मोदींसोबत महाराष्ट्रातील 5 खासदार मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. यात भाजप खासदार नितीन गडकरी, नारायण राणे व पियूष गोयल यांची नावे चर्चेत आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून खासदार संदिपान भुमरे व प्रतापराव जाधव यांच्या नावांवर विचार सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेतील एकमेव खासदार सुनील तटकरे किंवा राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांच्याही नावाचा मंत्रिपदासाठी विचार सुरू आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे नितीन गडकरी, नारायण राणे व पियूष गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले आहे. पण संदिपान भुमरे व बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना यावेळी प्रथमच केंद्रात मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. या नेत्यांच्या नावांवर अजून अंतिम शिक्कामोर्तब झाले नाही. पण त्यांची निवड जवळपास निश्चित असल्याचे मानले जात आहे.
संदिपान भुमरे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा 134650 मतांनी पराभव केला होता. त्यात भुमरे यांना 476130, तर जलील यांना 341480 मते मिळाली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार चंद्रकांत खैरे येथील निवडणुकीत 293450 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होतो. दुसरीकडे, प्रतापराव जाधव यांना बुलढाण्याची आपली जागा राखण्यात यश मिळाले होते. त्यांनी ठाकरे गटाचे आपले प्रतिस्पर्धी उमेदवार नरेंद्र खेडेकर यांचा 29479 मतांनी पराभव केला होता.