बालुफ ऑटोमेशन प्लेअर्स चषक
जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धा
पुणे-बालुफ ऑटोमेशन प्लेअर्स चषक द्वितीय जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील मुलींच्या १७ वर्षाखालील गटात नैशा रेवसकर हिने विजेतेपद पटकावले आणि दुहेरी मुकुट मिळविला. तिने यापूर्वी १५ वर्षाखालील गटात अजिंक्यपद मिळविले असून १९ वर्षाखालील गटातही अंतिम फेरी गाठली आहे. मुलांच्या सतरा वर्षाखालील गटात प्रणव घोलकर विजेता ठरला.
एक्स टेबल टेनिस प्लेअर्सतर्फे पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा शारदा स्पोर्ट्स सेंटर येथे सुरू आहे. त्यास बालुफ ऑटोमेशन या जर्मन कंपनीचे प्रायोजकत्व लाभले आहे.
मुलांच्या सतरा वर्षाखालील गटात शेवटपर्यंत उत्कंठावर्धक झालेल्या अंतिम लढतीत घोलकर याने कौस्तुभ गिरगावकर याच्यावर ९-११,११-६,५-११, १६-१४, ११-९ असा विजय मिळविला. दोन्ही खेळाडूंनी अष्टपैलू खेळ करीत शेवटपर्यंत सामन्यातील रंगत कायम ठेवली होती. घोलकर हा पीवायसी जिमखाना येथे दीपेश अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याने यंदा दहावीची परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण केली असून लवकरच तो अकराव्या इयत्तेत प्रवेश घेणार आहे.
मुलींच्या १७ वर्षाखालील गटात विजेतेपद मिळविताना रेवसकर हिने जान्हवी फणसे हिचा ११-६,११-७,११-३ असा दणदणीत पराभव केला. तिने टॉप स्पिन फटक्यांचा बहारदार खेळ केला. ती एम्स अकादमीत नीरज होनप यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. ती अभिनव प्रशालेत इयत्ता आठवीत शिकत आहे. १९ वर्षाखालील गटात विजेतेपदासाठी अग्रमानांकित रेवसकर व द्वितीय मानांकित तनया अभ्यंकर यांच्या गाठ पडेल. एकतर्फी झालेल्या उपांत्य फेरीत नैशा हिने श्रिया शेलार हिचे आव्हान ११-५,११-२, ११-७ असे संपुष्टात आणले. अन्य लढतीत तनया हिने साक्षी पवार हिचा ११-६, ११-६,११-८ असा सरळ तीन गेम्समध्ये पराभव केला.