पुणे, दि. ०७ जून २०२४: महावितरणच्या राज्यभरातील विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन्सला सौर ऊर्जा प्रकल्पांद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. या नियोजनातील पहिला प्रकल्प गणेशखिंड येथे नुकताच कार्यान्वित झाला आहे. महावितरणच्या ‘प्रकाशभवना’च्या छतावर ६० किलोवॅटच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे त्याच ठिकाणी असलेल्या विद्युत वाहन चार्जिंग स्टेशनला वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे.
गणेशखिंड येथील ‘प्रकाशभवना’च्या छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करून तेथील विद्युत वाहन चार्जिंग स्टेशनला वीजपुरवठा सुरु करण्याचा कार्यक्रम नुकताच झाला. केंद्रीय नवीन व नवकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सहसचिव श्री. दिनेश जगदाळे व संचालक (प्रकल्प) श्री. प्रसाद रेशमे यांच्याहस्ते हा प्रकल्प सुरु करण्यात आला. यावेळी प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे, मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार, अतिरिक्त महासंचालक (महाऊर्जा) श्री. पंकज तगलपल्लेवार, ‘आरईसी’च्या मुख्य कार्यक्रम अधिकारी श्रीमती सरस्वती, महाव्यवस्थापक श्री. संजय त्रिपाठी (मुंबई) व श्रीमती नविता डुबल (गुरूग्राम) यांची प्रमुख उपस्थिती होती.
गणेशखिंड येथील ‘प्रकाशभवन’ इमारतीच्या आवारात विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन आहे. या चार्जिंग स्टेशनला सौर ऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यासाठी इमारतीच्या छतावर ६० किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम निविदा प्रक्रियेनंतर सुरू करण्यात आले होते. संचालक (प्रकल्प) श्री. प्रसाद रेशमे यांनीही पाहणी करून सौर प्रकल्प उभारणीच्या कामाला वेग दिला. प्रकल्पाच्या पॅनेल्सच्या उभारणीचे काम पूर्ण झाल्यानंतर सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. या प्रकल्पातून दरमहा सुमारे ७ हजार २०० युनिट विजेची निर्मिती होणार असून त्याद्वारे चार्जिंग स्टेशनला पुरवठा सुरु करण्यात आला आहे.
महावितरणकडून राज्यभरात अनेक उपकेंद्र व प्रशासकीय इमारतीच्या आवारात विद्युत वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत. यात पुणे परिमंडलामध्ये शहरी व ग्रामीण भागात एकूण १८ ठिकाणी विद्युत वाहनांचे चार्जिंग स्टेशन्स कार्यान्वित झाले आहेत. या चार्जिंग स्टेशनला हरित ऊर्जेतून वीजपुरवठा करण्यासाठी आता चार्जिंग स्टेशनलगतच्या इमारतीवर किंवा खुल्या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. त्यातील पहिला प्रकल्प गणेशखिंड येथे पूर्णत्वास गेला आहे. या कार्यक्रमाला अधीक्षक अभियंता सर्वश्री अरविंद बुलबुले, युवराज जरग, संजीव राठोड, अनिल गेडाम, अमित कुलकर्णी, संजीव नेहते आदींची उपस्थिती होती.