श्रीनगर -गुलमर्ग : दिवंगत अभिनेते राजेश खन्ना आणि अभिनेत्री मुमताज यांचा आप की कसम हा सिनेमा अनेकांनी पाहिला असेल. सिनेमातील जय जय शिव शंकर कांटा लगे ना कंकर हे गाणं देखील लक्षात असेल. हे गाणं खूप लोकप्रिय झालं.
गाण्यातील लोकेशननं देखील सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. गाण्याचे बोल, तो डोंगर आणि तिथे असलेलं शिव मंदिर आजही लोकांच्या लक्षात आहे. हे गाणं गुलमर्ग येथील मोहिनेश्वर या शिव मंदिराच्या बाहेर शुट करण्यात आलं होतं. याच मंदिरात 5 जूनच्या संध्याकाळी अचानक आग लागली. ही आग इतकी भीषण होती की संपूर्ण मंदिर यात जळून खाक झालं आहे.
मोहिनेश्वर शिव मंदिराला आग कशी लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण घटनास्थळी पोहोचली अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. 1974 साली आलेल्या आप की कसम या सिनेमातील जय जय शिव शंकर या गाण्यानं हे मंदिर देखील प्रसिद्धीझोतात आलं होतं.
मोहिनेश्वर मंदिराला लागलेल्या आगीत कोणतीही जीवतहानी झालेली नाही. आगीत मंदिराचा वरचा भाग संपूर्णपणे लाकडाचा होता. त्यामुळे मंदिराचा वरचा भाग संपूर्ण जळून खाक झाला आहे. ही घटना घडली तेव्हा मंदिरात कोणी नव्हतं. मंदिरातील चौकीदार देखील मंदिराच्या आवारात नव्हता. पर्यटकांसाठी हे मंदिर आकर्षक स्थळ होतं.या मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे, हे मंदिर मध्यभागी आहे. त्याच्या एका बाजूस मस्जिद आहे तर दुसऱ्या बाजूस गुरुद्वार आणि एकीकडे चर्च आहे. सगळ्या धर्माची धार्मिक स्थळ या ठिकाणी आहेत. त्यामुळे गुलमर्गमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी हे मंदिर आकर्षणाचं केंद्र होतं. 2021 साली या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता.
हे मंदिर जम्मू-काश्मीरचे शेवटचे डोगरा शासक महाराज हरि सिंह यांच्या राणी मोहिनीबाई सिसोदिया यांनी 1915 साली बांधलं होतं. या मंदिराला मोहनेश्वर शिवालय आणि राणी मंदिर असंही म्हटलं जातं. मंदिराची देखभाल एक मुस्लिम कुटुंब करत असल्याचं सांगितलं जातं.