निशाद लेले व नैशा रेवसकर
यांना एकेरीचे विजेतेपद
पुणे—
बालुफ ऑटोमेशन प्लेअर्स चषक द्वितीय जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत पाचवा मानांकित निशाद लेले व अग्र मानांकित नैशा रेवसकर यांनी अनुक्रमे पंधरा वर्षाखालील मुले व मुली या गटात विजेतेपद पटकाविले.
एक्स टेबल टेनिस प्लेअर्सतर्फे पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा शारदा स्पोर्ट्स सेंटर येथे सुरू आहे. त्यास बालुफ ऑटोमेशन या जर्मन कंपनीचे प्रायोजकत्व लाभले आहे. मुलांच्या पंधरा वर्षाखालील गटातील अंतिम सामन्यात पाचवा मानांकित निशाद याने द्वितीय मानांकित आदित्य सामंत याच्यावर आश्चर्यजनक विजय नोंदविला. हा सामना त्याने ६-११,११-२,६-११, ११-४,११-७ असा जिंकताना टॉप स्पिन फटक्यांचा बहारदार खेळ केला. तो सन्मय परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. उपांत्य फेरीत लेले याने अनुज फुलसुंदर याचे आव्हान ७-११, १३-११,१२-१०,११-७ असे संपुष्टात आणले होते. द्वितीय मानांकित सामंत याने तृतीय मानांकित नील नवरे याला ११-८,६-११, ३-११, ११-७,११-७ असे पराभूत केले.
मुलींच्या पंधरा वर्षाखालील गटात नैशा रेवसकरला विजेतेपद मिळवताना संघर्ष करावा लागला. तिने चुरशीच्या सामन्यात वेदांगी जुमडे हिला ११-२,११-९,१२-१० असे पराभूत केले. तिने आपल्या अव्वल मानांकनास साजेसा खेळ करीत अष्टपैलू कौशल्य दाखविले. नैशा ही एम्स अकादमीत नीरज होनप यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.
खुल्या गटाच्या दुहेरीत नील मुळ्ये व ईशान खांडेकर ही जोडी विजेती ठरली. उत्कंठा पूर्ण झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी शुभंकर रानडे व वैभव दहिभाते यांचा ११-७,८-११,१४-१२, ११-९ असा पराभव केला. दोन्ही जोड्यांनी शेवटपर्यंत आक्रमक खेळ करीत प्रेक्षकांची मने जिंकली.