पुणे:
कल्याणीनगर मधील महावितरणच्या फीडर पिलरला लागलेल्या आगीच्या घटनेशी एमएनजीएलचा कोणताही संबंध नाही. एमएनजीएलच्या वाहिनीचे नुकसान होण्यापूर्वी ३० मिनिटे आधीच महावितरणच्या फीडर पिलरला आग लागली होती. त्यामुळे महावितरणने याची सखोल माहिती घ्यावी असे एमएनजीएलने आपल्या पत्रकातून सांगितले आहे.
कल्याणीनगर मधील बिशप शाळेजवळ महावितरणच्या उच्च दाबाच्या फिडर पिलरला बुधवारी (दि.५ जून) सकाळी ११ च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. सदर घटनेनंतर महावितरणकडून महाराष्ट्र नॅचरल गॅसवर दोषारोपण करण्यात येत आहे. सदर घटनेसंदर्भात एमएनजीएलनेही सविस्तर पत्रक प्रसिद्ध केले असून, घटनेची सविस्तर माहिती दिली आहे.
एमएनजीएलने आपल्या पत्रकात म्हटलं आहे की, कल्याणीनगर जवळील बिशप स्कूल येथे एमएनजीएलच्या गॅस पाइपलाईनजवळ पाण्याची लाईन टाकण्याचे काम त्रयस्थ कंपनीकडून सुरु आहे. सदर काम सुरू असताना सकाळी ११.३० च्या सुमारास एमएनजीलच्या वाहिनीचे जेसीबीमुळे नुकसान झाले. सदर प्रकाराची माहिती एमएनजीएलच्या इमरर्जनसीच्या टीमला मिळताच, एमएनजीएलची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर इमरर्जनसी टीमने वॉल्व बंद करून गॅस पुरवठा खंडित केला.
एमएनजीएलने आपल्या पत्रकात पुढे म्हणाले आहे की, महावितरणच्या फीडर पिलरला लागलेली आग ही सकाळी ११ च्या सुमारास लागली आहे. तसेच सदर घटना एमएनजीएलच्या वाहिनीच्या ठिकाणापासून अंदाजे २०० मीटर अंतरावर आहे. त्यामुळे एमएनजीएलच्या वाहिनीचे नुकसान होण्याच्या ३० मिनिटांपूर्वी महावितरणच्या फीडर पिलरला आग लागली. एमएनजीएलचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. त्यामुळे महावितरणने या प्रकरणी एमएनजीएलवर दोषारोपण करणे पूर्णपणे चुकीचे आहे, असेही एमएनजीएलने आपल्या पत्रकात म्हटले आहे.