पुणे, दि. ५ जून २०२४: महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या (एमएनजीएल) पाइपलाईनमधून गॅस गळतीमुळे जवळच असलेल्या महावितरणच्या उच्चदाबाच्या फिडर पिलरला बुधवारी (दि. ५) सकाळी ११ च्या सुमारास आग लागली. त्यामुळे सुमारे ३५०० ग्राहकांचा वीजपुरवठा सुमारे ४५ मिनिटे बंद होता. रामवाडी येथील बिशप शाळेजवळ हा प्रकार घडला.
याबाबत माहिती अशी की, कल्याणीनगर परिसरातील रामवाडी येथे बिशप शाळेजवळ महावितरणचा उच्चदाबाचा फिडर पिलर आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास अतिरिक्त पर्यायी व्यवस्था म्हणून हा फिडर पिलर लावण्यात आला आहे. त्या जवळच एमएनजीएलची पाइपलाईन आहे. मात्र आज सकाळच्या सुमारास एमएनजीएलच्या पाइपलाईनमधून गॅस गळती होऊन आग लागली. ही आग फिडर पिलरपर्यंत पोहाचल्याने त्यानेही पेट घेतला. त्यामुळे उपकेंद्रातील वीजवाहिनी ट्रीप होऊन वीजपुरवठा खंडित झाला.
या प्रकाराची माहिती कळताच महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन वीज पुरवठा बंद झाल्याची खात्री केली व फिडर पिलरच्या भूमिगत वाहिन्या वेगळ्या केल्या. त्यानंतर बंद पडलेली उपकेंद्रातील वीजवाहिनी पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र यात सुमारे ३५०० ग्राहकांचा वीजपुरवठा ४५ मिनिटे बंद राहिला. या प्रकरणी महावितरणकडून पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.