पुणे, 5 जून 2024
भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाअंतर्गत केंद्रीय संचार ब्युरो, पुणे महानगरपालिका आणि मराठवाडा मित्र मंडळ संचलित आयएमईआरटी महाविद्यालय यांच्या वतीने आज कर्वे नगर येथील आयएमईआरटी महाविद्लायात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या कार्यक्रमास नेहरू युवा केंद्र, कावेरी इंटरनॅशनल स्कूल आणि वर्शिप अर्थ फाऊंडेशन यांचेही सहकार्य लाभले.
याप्रसंगी पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त संजय शिंदे, सहायक आयुक्त विजय नायकळ, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. केतकी घाटगे, नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी आशिष शेटे, आयएमईआरटी महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. शुभांगी रामस्वामी, वर्शिप अर्थ फाऊंडेशनच्या सह-संस्थापिका आम्रपाली चव्हाण, कावेरी इंटरनॅशनल स्कूलच्या समन्वयक गौतमी पांडेय, केंद्रीय संचार ब्युरोचे प्रसिद्धी अधिकारी हर्षल आकुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर महाविद्यालयातील उपस्थित मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि परिसरातील नागरिक यांनी संपूर्ण परिसरात स्वच्छता मोहिम राबवली. पुढील सत्रात कावेरी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणसंदर्भात जनजागृतीपर गीत सादर केले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पुणे महापालिका उपायुक्त संजय शिंदे म्हणाले की पर्यावरणाचे रक्षण करणे ही कोणत्याही एका व्यक्तीची जबाबदारी नसून प्रत्येकाला त्यासाठी हातभार लावावा लागणार आहे. प्लास्टिकचा वापर टाळणे, पाणी जपून वापरणे, स्वच्छता राखणे, ओला-सुका कचरा विलगीकरण यांच्यासारख्या लहान-लहान गोष्टींमधून पर्यावरणाचा समतोल राखण्यास आपल्याला मदत होऊ शकते.
आयएमईआरटी महाविद्यालयाच्या संचालिका शुभांगी रामस्वामी म्हणाल्या की संयुक्त राष्ट्राने 1973 पासून पर्यावरण दिन हा दिवस 5 जून रोजी साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र आपण मनात आणल्यास प्रत्येक व्यक्ती वर्षातील प्रत्येक दिवस पर्यावरणासाठी साजरा करू शकते. त्यासाठी कोणतीही एक पर्यावरणपूरक कृती दररोज करण्याचा संकल्प आपण करू शकतो.
कार्यक्रमाच्या अखेरीस, सर्व उपस्थितांनी पर्यावरण रक्षण आणि स्वच्छता राखण्यासंदर्भात प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अपर्णा शास्त्री यांनी केले, तर आभार प्रसिद्धी सहायक पी. फणीकुमार यांनी मानले.