मुंबई-महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीचा मानहाणीकारक पराभव झाला. त्यात भाजपला अवघ्या 9 जागा मिळाल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी या पराभवाची जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी स्वीकारली. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी माझा राजीनामा स्वीकारून मला पूर्णवेळ विधानसभेसाठी झोकून काम करण्याची संधी द्यावी, असे ते म्हणालेत. त्यांच्या या भूमिकेमुळे भाजपच्या गोटात एकच खळबळ माजली आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. त्यात महाराष्ट्रात महायुतीने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. राज्यात सत्ताधारी महायुतीला अवघ्या 17 जागांवर समाधान मानावे लागले. यात भाजपला अवघ्या 9 जागा मिळाल्या. तर शिवसेनेला 7 व राष्ट्रवादी काँग्रेसला अवघी 1 जागा मिळाली. दुसरीकडे, विरोधी बाकावरील महाविकास आघाडीला तब्बल 30 जागा मिळाल्या. त्यात काँग्रेसला सर्वाधिक 13 जागा मिळाल्या. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 9, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 8 जागा मिळाल्या.
महायुतीच्या या हाराकिरीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर सवाल उपस्थित केला जात होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यातील भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्य मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची तयारी दर्शवली आहे.
मी पळून जाणारा माणूस नाही. मी या पराभवाची जबाबदारी घेतो. भाजप पुन्हा जनतेत जाऊन नव्या जोमाने काम करेल. लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे. त्यानुसार माझी राजीनामा देण्याची तयारी आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी माझा राजीनामा स्वीकारावा व मला पूर्णवेळ विधानसभेसाठी झोकून काम करण्याची संधी द्यावी, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही. किंबहुना आम्हाला आमच्या अपेक्षेपेक्षा फार कमी जागा मिळाल्या. महाराष्ट्रात आमची लढाई महाविकास आघाडीसोबत होती. विरोधकांनी आमच्याविरोधात संविधान बदलण्यासंबंधीचा एक नरेटिव्ह सेट केले होते. हा नरेटिव्ह मोडित काढण्यात आम्हाला अपयश आले. आम्हाला त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देता आले नाही. त्याचा फटका आम्हाला बसला. पण आम्ही जनतेचा जनादेश मान्य करून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना जास्त जागा मिळाल्या त्यांचे मी अभिनंदन करतो, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रातील जनतेचा जनादेश आम्हाला मान्य आहे. राज्यात भाजपला नाकारण्यात आल्याची स्थिती नाही. आम्हाला समसमान मते मिळाली आहेत. आज आम्ही बसून निवडणूक निकालाचा आढावा घेतला. निवडणुकीत पक्ष कुठे कमी पडला त्यावर आम्ही विचार केला. त्यात राज्यात काही ठिकाणी सत्ताविरोधी लाट दिसून आली. काही ठिकाणी कांद्याचा प्रश्न होता. सोयाबीन व कापसाचाही काही ठिकाणी प्रश्न होता. विशेषतः सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतरही सरकारविरोधात एक नरेटिव्ह तयार करण्यात आले. त्याला आम्ही उत्तर देऊ शकलो नाही, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महायुतीमधील मित्रपक्षांसोबत समन्वयाचे काही प्रश्न निर्माण झाल्याचेही यावेळी मान्य केले. आमच्या मित्रपक्षांसोबत समन्वयाचे काही प्रश्न निर्माण झालेत. त्याची आम्ही नोंद घेतली आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन यासंबंधीचा योग्य तो निर्णय घेतला जाईल. आम्ही नव्याने रणनीती आखून कामाला सुरुवात करू, असे ते म्हणाले. फडणवीस यांच्या या विधानामुळे महायुतीमधील तिन्ही घटकपक्षांचे पुढे काय होणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केंद्रात सलग तिसऱ्यांदा एनडीएला सरकार स्थापन करण्याचा कौल मिळाल्याबद्दल मतदारांचे आभारही मानले. पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा आशीर्वाद मिळाला आहे. देशात पुन्हा एनडीएचे सरकार येत आहे. 1962 नंतर पहिल्यांदाच असे होत आहे. ओडिशातही प्रथमच भाजपचे सरकार येत आहे. आंध्र प्रदेशात चंद्राबाबू यांच्या नेतृत्वाला पसंती मिळाली. अरुणाचलमध्येही पुन्हा एकदा भाजपचे सरकार आले आहे. जनता एनडीए व भाजपसोबत आहे हे यातून स्पष्ट होते.
देशात केंद्र सरकारविरोधात विरोधकांनी इंडिया आघाडी तयार केली होती. या इंडियाला एकत्रित जेवढ्या जागा मिळाल्या, त्याहून अधिक जागा देशात भाजपला मिळाल्या. विरोधकांनी मोदी सरकारविरोधात वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला. पण भाजपला त्यांच्याहून अधिक जागा जिंकण्यात यश आले, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.