पुणे- बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी तब्बल एक लाख ५३ हजार मतांनी, तर शिरूर मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हे यांनी एक लाख ४१ हजार मतांनी दणदणीत विजय मिळविला.मावळ मतदारसंघातून शिंदेसेनेचे श्रीरंग बारणे यांनी ९६ हजार ६१५ मतांनी विजय मिळवून हॅट्ट्रिक केली, तर पुण्यातून भारतीय जनता पक्षाचे मुरलीधर मोहोळ एक लाख २२ हजार मतांनी विजयी झाले. जिल्ह्यात दोन जागांवर विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दमदार कामगिरी केली.
सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा यांना या निवडणुकीत उभे केले होते. नणंद-भावजय या निवडणुकीत समोरासमोर होत्या. अजित पवार यांनी सुनेत्रा यांच्यासाठी सर्व ताकद पणाला लावली होती. भावनिक मुद्द्यांवर झालेल्या या निवडणुकीत मतदारांनी शरद पवार यांच्यावर विश्वास कायम ठेवला.
शिरूरमध्ये डॉ. कोल्हे यांच्यासमोर शिवसेनेकडून तीन वेळा खासदार झालेले शिवाजीराव आढळराव पाटील यांचे आव्हान होते. आढळराव पाटील यांनी यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढविली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी त्यांच्यासाठी जोर लावला होता. परंतु, मतदारांना डॉ. कोल्हे निवडून दिले त्यांचा विजय प्रथम पासून निश्चित मानला जात होता त्यामुळे तो धक्कादायी वगैरे अजिबात भासला नाही.
मावळमध्ये श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संजोग वाघेरे पाटील यांच्यात लढत झाली. दोन वेळच्या खासदारकीच्या अनुभवाच्या जोरावर बारणे यांनी विजय मिळविला. पुणे शहरात मोहोळ यांच्यासमोर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी आव्हान निर्माण केले होते. धंगेकर यांनी सुरवातीच्या तीन-चार फेऱ्यांत आघाडी मिळविली होती. तेव्हा भाजपच्या गोटात काही वेळ चिंता निर्माण झाली होती.परंतु, त्यानंतरच्या सलग फेऱ्यांत आघाडी घेत मोहोळ यांनी सहज विजय मिळविला . राष्ट्रवादी काँग्रेसमधून ४० आमदारांसह बाहेर पडून अजित पवार हे भाजपबरोबर राज्यातील सत्तेत सहभागी झाले. उपमुख्यमंत्री झाल्यावर अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबरोबर पहिल्यांदाच थेट सामना झाला.पण त्यांच्याच जिह्यात अजित पवारांचा सपाटून पराभव झाला .सडेतोड दादांनी अनेकांना दिलेली आव्हाने आणि सर्वांशीच ठेवलेले अरे कारे चे आचरण याहून अधिक काकांशी केलेली गद्दारी त्यांना भोवली.
त्यांच्यासोबत भाजप आणि शिवसेना होती. त्यामुळे बारामती, शिरूर मतदारसंघातील निवडणुकीबाबत कुतूहल निर्माण झाले होते.