जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे हे राजकीय प्रभावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोप करत केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिणारे खेडचे प्रांताधिकारी तथा खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांची या पदावरून उचलबांगडी करण्यात आली.
पुणे:सहायक निवडणुक अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी पुण्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात तक्रार करत थेट निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. कट्यारेंनी अजित पवार गटाचे खेडचे आमदार दिलीप मोहितेंवरही ( Dilip Mohite) गंभीर आरोप केले होते. लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला अगदी काही अवघी उरला असतानाच खेडच्या प्रांताधिकाऱ्यांची सहाय्यक निवडणूक अधिकारी पदावरून उचलबांगडी करण्यात आली असून त्यांना बडतर्फ केले आहे.बदली होण्याऐवजी थेट जोगेंद्र कट्यारे यांनाच बडतर्फ करण्यात आलं. त्यांच्या जागी सारथीचे उपजिल्हाधिकारी अनिल पवारांची सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून वर्णी लावण्यात आली आहे.विभागीय आयुक्त सी.एल.पुलकुंडवार यांनी याबाबतचा अध्यादेश काढला आहे.
पुण्याचे ‘जिल्हाधिकारी आणि मुख्य निवडणूक अधिकारी असलेल्या सुहास दिवसेंमुळं माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलीये, अशा मजकुराचा लेटर बॉम्ब टाकून खेडचे प्रांताधिकारी असलेले जोगेंद्र कट्यारे यांनी खळबळ उडवून दिली. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या तोंडावर दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमधील वाद चव्हाट्यावर आल्यानं राजकीय तसेच प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.
‘राष्ट्रवादी अजित पवार Ajit Pawar गटाच्या एका आमदाराच्या सांगण्यावरून कलेक्टर माझा मानसिक छळ करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी या पत्राद्वारे केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात पुणे रिंग रोड कामाबाबत चौकशी समिती लावून या चौकशीत आपणास गुंतवून ठेवले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची चुकीची कामं आणि आर्थिक मागणी पूर्ण करत नसल्याने माझ्याविरोधात वारंवार तक्रारी केल्या जात आहेत. आता हे सर्व सहन होत नसल्याने माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, असे कट्यारेंनी पत्रात नमूद केले आहे.