- उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांचे आश्वासन
- चालक मालकांच्या प्रश्नांवर बाबा कांबळे यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट
पिंपरी ! प्रतिनिधी
फिटनेस प्रमाणपत्र वेळेत न घेणाऱ्या वाहनधारकांवर दिवसाला ५० रुपयांचा दंड आकारला आहे. या बाबत सविस्तर माहिती घेऊन कोणावरही अन्याय होणार नाही, यासाठी सकारात्मक तोडगा काढू असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी ऑटो, टॅक्सी, बस ट्रान्सफर फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांना दिले. आचारसंहितेच्या नियमांचे पालन करून आताच काही निर्णय घेण्यात येतील. अथवा आचारसंहितेनंतर निर्णय घेऊ असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
ऑटो, टॅक्सी, बस ट्रान्सफर फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी रिक्षा चालक व इतर वाहनधारकांच्या प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. पुण्यातील खासगी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री पवार उपस्थित होते. या वेळी त्यांच्यापुढे बाबा कांबळे यांनी विविध समस्या मांडल्या.
ऑटो, टॅक्सी, बस चालक मालकांवर अन्याय करणारा निर्णय घेतला आहे. नुकताच फिटनेस प्रमाणपत्र बाबत आरटीओने चुकीचा निर्णय घेतल्याची तक्रार वाहनधारक संघटना करत आहे. उशिरा प्रमाणपत्र घेतल्यास प्रत्येक दिवसाला पन्नास रुपये दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे अनेकांना हजारो रुपये दंड होणार आहे. एवढा दंड भरणे कठीण असल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले. दंडाची हि रक्कम कमी करावी अशी मागणी बाबा कांबळे यांनी केली. या मागणीसह अनेक मागण्यांचे गाऱ्हाणे मांडण्यात आले. या मध्ये रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा आदेश पारित झालेला आहे. मात्र याबद्दल तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी. मुक्त रिक्षा परवाना बंद करण्यात यावा. ओला उबेर या कंपन्यांना प्रशासनाने प्रवासी वाहतूक करण्यास बंदी घातली आहे. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी. या प्रश्नासह सर्व इतर विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या प्रश्नांची दखल घेत हा दंड का वाढला याची तातडीने दखल घेत माहिती घेतली. दंड का वाढला, काय प्रश्न रखडलेले आहेत. त्याबद्दल माहिती घेतली. जे प्रश्न आचारसंहितेच्या मर्यादेमध्ये येत नाहीत असे प्रश्न तातडीने सोडविले जातील. ज्या प्रश्नांना आचारसंहितेची अडचण आहे, त्या प्रश्नांबद्दल सहा तारखेनंतर लक्ष घालून प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले. सहा तारखेनंतर बैठक बोलावली जाईल. त्यामध्ये अडचणींवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याची माहिती बाबा कांबळे यांनी दिली.
फिटनेस प्रमाणपत्राबाबत आरटीओने दिवसाकाठी ५० रुपयांची आकारणी केली आहे. ही अन्यायकारक वसुली आहे. यासह चालक मालकांचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्यावर तोडगा काढण्याच्या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात भेट घेतली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सहा तारखेनंतर बैठक बोलावून रितसर मार्ग काढला जाणार आहे. तसेच जे प्रश्न तातडीने सोडवता येतील त्यावर त्वरित अमंलबजावणी करण्यासाठी अजित पवार यांनी सकारात्मकता दाखवली.