पुणे:कल्याणीनगर अपघात प्रकरणात आमदार सुनील टिंगरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती कल्याणीनगर अपघात प्रकरणात त्यांनी पोलिसांवर दबाव आणला, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला हे आरोप बिनबुडाचे आहेत. तसे काही झालेले नाही.’ असे सांगत उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सुनील टिंगरे यांच्यावरील टीकेला उत्तर देत त्यांची पाठराखण केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी टिंगरे यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नाबाबत पवार म्हणाले, “”कल्याणीनगर येथील अपघातानंतर टिंगरे यांना कोणाचा फोन आला होता, हे त्यांनी अगोदरच स्पष्ट केलेले आहे. ते पोलिस ठाण्यात आले, मात्र त्यांनी कोणालाही पाठीशी घातलेले नाही. टिंगरे यांची तब्येत बरी नसल्याने ते माध्यमांसमोर येऊ शकले नाहीत. माझे त्यांच्याशी बोलणे झाले असून कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची त्यांची तयारी आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री म्हणून पोलिसांना योग्य सूचना दिल्या आहेत.”पवार म्हणाले, “या अपघात प्रकरणाची सरकार व पोलिसांकडून योग्य प्रकारे चौकशी सुरू आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष घातल्याने अल्पवयीन मुलाविरोधात आणखी कलमे लावण्यात आली आहेत. त्यातून अनेक गोष्टी समोर आल्या. अल्पवयीन मुलाला बाल न्यायमंडळाने जामीन मंजूर केला होता. या प्रकरणाची देखील सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई केली जाईल. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही’