पुणे: ‘राष्ट्रवादीच्या आमदाराच्या सांगण्यावरून जिल्हाधिकारी दिवसे हे मानसिक छळ करीत आहेत. दिवसेंच्या त्रासामुळे माझ्यावर आत्महत्येची वेळ आली आहे, असे जाहीरपणे सांगून प्रांत अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी प्रशासनात खळबळ उडवून दिली आहे. दिवसे निवडणूक निर्णय अधिकारी तर कटारे सहायक निवडणूक अधिकारी आहेत दिवसेंविरोधात कट्यारेंनी थेट राज्याचे मुख्य सचिव आणि निवडणूक आयोगाला पत्र धाडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते आणि दिवसे हे ठरवून त्रास देत असल्याचेही कट्यारे यांनी पत्रात म्हटले आहे.
कट्यारे यांनी केलेल्या आरोपावर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, “माझ्यावर आरोप असलेले पत्र मी आज पाहिले, मी एकाचवेळी जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून दोन पातळ्यांवर काम करत असतो.
माझ्यावर आरोप करणाऱ्या कट्यारे यांनी यात गल्लत केली आहे. कट्यारे यांची बदली करण्याचा अधिकार शासनाला आहे. मी जिल्हाधिकारी पदावर येण्याआधी कट्यारे यांच्याविरोधात तक्रारी आल्या होत्या आणि त्यांची चौकशी करण्यात येते आहे. कट्यारे यांच्याकडून जमीन अधिग्रहणाची भरपाई देण्याची जबाबदारी काढून घेण्यात आल्याने ते व्यथित झाले असावेत, असे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी म्हटले आहे.
प्रांताधिकारी कट्यारे यांनी भरपाई देण्याच्या निकालात अनेक बदल केलेले आहेत. कट्यारे यांनी आरोप करून नियमभंग केलेला आहे, कट्यारे यांनी जर चुकीचे काही केलेले नसेल तर त्यांनी तपासणीला घाबरण्याचे कारण नाही. राजकीय संबंध असल्याच्या आरोपांना उत्तर देण्यात अर्थ नाही, मी पुणे जिल्ह्यातील २१ आमदारांसोबत आणि चार खासदारांसोबत काम करतो, असे प्रत्युत्तर दिवसे यांनी दिले.
अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहितेंनी प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांच्या आरोपावर प्रत्युत्तर दिले ते म्हणाले की, “पुण्यातील खेड-राजगुरूनगरचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारेंनी कायतरी पाप केलंय, म्हणूनच मी आत्महत्या करेन, अशी धमकी त्यांना द्यावी लागत आहे. सरकारने या प्रकरणाची चौकशी करावी. येत्या अधिवेशनात मी प्रांताधिकारी कट्यारे आणि तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्याबाबतचा हा प्रश्न उपस्थित करणार आहे” असे मोहितेंनी सांगितले.