पुणे, दि. २८ : इंदापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह येथे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली असून इच्छुकांकडून प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
या वसतिगृहात इयता ८ वी ते १० वी, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय व व्यावसायिक महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. वसतिगृहात अनुसूचित जाती प्रवर्गास ८० टक्के राखीव प्रवेश असून उर्वरित जागांवर इतर प्रवर्गातील तसेच अपंग व अनाथ विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाईल.
वसतिगृहाची प्रवेश क्षमता कमाल १०० असून विद्यार्थ्यांना विनामूल्य निवास, अंथरूण, पांघरुण, भोजन, पुस्तके, स्टेशनरी, शैक्षणिक बाबींकरीता आर्थिक सहाय्य, दरमहा ५०० रूपये निर्वाह भत्ता, ग्रंथालय आदी सुविधा पुरविण्यात येणार आहे.
अर्जासोबत गुणपत्रिका, पालकांचा उत्पनाचा दाखला, जातीचा दाखला, आधार कार्डची प्रत, रहिवाशी दाखला, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत, बोनाफाईड व प्रवेश घेतल्याबाबतची शैक्षणिक शुल्क पावती इत्यादी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांनी व पालकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, दूधगंगा डेअरी समोर, अकलूज- बारामती रोड, जुना बायपास रोड, इंदापूर येथे संपर्क साधून प्रवेश अर्ज घेऊन परिपूर्ण भरून द्यावेत, असे आवाहन वसतिगृहाचे गृहपाल पी. आर. हेळकर यांनी केले आहे.