दोन्ही डॉक्टरांना 30 पर्यंत पोलिस कोठडी
कल्याणीनगर येथील अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि एका शिपायालाही अटक करण्यात आली होती. त्यांनी ब्लड सँपलमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे. त्याप्रकरणी कोर्टानं डॉ. तावरे व डॉ. हळनोर यांना 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पुणे- कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि वडिल विशाल अग्रवालला 4 दिवसांपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दोघेही आता 31 मे पर्यंत पोलीस कोठडी असणार आहेत.सुरेंद्रकुमार आणि विशाल अग्रवाल या दोन्ही बाप-लेकाला आज न्यायालयात हजर करण्यात आले. ड्रायव्हरचं अपहरण, मुलाचा गुन्हा स्वतःवर घ्यावा, अन तसं न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोर्टामध्ये सुनावणी झाली. अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्रकुमार आधी अटकेत होते. विशाल अग्रवालला याप्रकरणी आज अटक दाखवण्यात आलेली आहे.
कोर्टामध्ये दोन्ही पक्षाच्या बाजूने जोरदार युक्तीवाद झाला. सरकारी वकील आणि बचाव पक्षाचे वकील यांच्यामध्ये खडाजंगी झाली. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टानं आरोपी सुरेंद्रकुमार आणि विशाल अग्रवाल यांना 31 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
बचाव पक्षाचे वकील प्रशांत पाटील-
तीन वेगवेगळ्या एफआयर या एकाच केसमध्ये झाल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यासोबत छेडछाड झाली आहे की नाही हे त्यांना बघायचं आहे. अग्रवाल यांच्या घरातील सीसीटीव्ही ताब्यात घेतले आहेत, त्यात अजून काय सर्च करण्यासारखं नाही. ड्रायव्हरने त्याच्या पत्नीसह घरी येत आमचे मोब लिंचींग होइल असं सांगितलं. यासाठी तो घरी आला. नंतर फक्त त्याची बाईक घेण्यासाठी अग्रवाल यांच्या घरी आला होता.
सरकार वकील म्हणाले-
अपघाताची घटना वेगळी आहे. आम्हाला याप्रकरणाचा जॉइंट तपास करायचा आहे. मोबाईल तपास सुरू आहे. या सगळ्यांची पोलिस कोठडी गरजेची आहे. कारण उर्वरित प्रकरणात आणखी लोक सहभागी असल्याचा संशय आहे. त्यासाठी चौकशी करणे आवश्यक आहे.
सुरेंद्रकुमार अग्रवाल म्हणाले-
दुर्दैवी अपघात झाला. सकाळी मला याबाबत समजलं. त्यावेळी मी तात्काळ ड्रायव्हरला घेऊन गेलो. त्याच्यासोबत दोन मिनिटं बोलणं झालं. त्यानंतर मी त्याला घरच्यांना फोन कर असे सांगितले. आम्ही एक प्रतिष्ठित कुटुंब आहोत.
सरकारी वकील म्हणाले-
सुरेंद्रकुमार आणि विशाल अग्रवाल या दोघांची 7 दिवसांची पोलिस कोठडी हवी आहे. ड्रायव्हरचा फोन या दोघांनी काढून घेतला आहे, जो अद्याप पोलिसांना दिलेला नाही. तो मोबाईल हस्तगत करण्यासाठी दोघांचाही तपास एकत्र करणं गरजेचं आहे. या गुन्ह्यात आणखी कोणी मदत केली आहे का? याचा सखोल तपासासाठी 7 दिवसांची पोलिस कोठडी मिळावी.