पुणे : संत मुक्ताई – कान्होपात्रा यांचे अभंग, बहिणाबाईंच्या कविता, ओव्या आदींच्या माध्यमातून मराठी संस्कृतीची ओळख घडवत व स्वातंत्र्यवीर सावकार यांच्या जीवनातील विविध पैलू उलगडत आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना आदरांजली वाहण्यात आली.
निमित्त होते स्वातंत्र्यवीर सावरकर फाऊंडेशनच्या वतीने सावरकरांच्या जयंती निमित्त आयोजित तीन दिवसीय ‘स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती महोत्सव 2024’ चे. यामध्ये आज ‘माय बोली साजिरी’ या संस्कृतीवर्धक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अभंग, कविता, ओव्या, म्हणी, उखाणे, गाणी, संत साहित्य, शस्त्रास्त्र, वाद्य, पेहराव आदी विषय या अभिवाचनात्मक कार्यक्रमात मांडण्यात आले.
लेखक राजीव बर्वे, बाल साहित्यिका संगीता बर्वे, मेघा विश्वास आणि स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रितम थोरवे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरूवात झाली. यावेळी भाजप युवा मोर्चा प्रदेश उपध्यक्ष कुणाल टिळक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला शंखनाद करून गणेश स्तवन सादर करण्यात आले. त्यानंतर ‘अनादी मी अनंत मी..’, अथर्वशीर्ष, विष्णू स्मरण, वासुदेवाची गाणी, बहिणाबाई चौधरी यांच्या कविता, ‘हा नमस्कार महाराष्ट्राचा..’ हे गीत, मुक्ताई – कान्होपात्रा यांचे अभंग, सुधीर मोघे यांची ‘शब्द’ ही कविता, संगीत ‘संन्यस्त खड्ग’ नाटकातील ‘मर्म बांधातील ठेव ही..’ हे नाट्य संगीत सादर करून कलाकारांनी उपस्थितांची मने जिंकली.
तपस्या नेवे, अमेय रानडे, वारूण देवोरे, समीर सुमन आदी कलाकारांनी हा बहारदार कार्यक्रम सादर केला. त्यांना अंशुमान गऱ्द्रे, शशांक पडवळ यांनी त्यांना संथासांगत केली.
यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर फाऊंडेशनचे सचिव मेघ:श्याम देशपांडे, कोषाध्यक्ष अमित गोखले, उपाध्यक्ष प्रशांत साठे, कार्याध्यक्ष पुनम देसाई पवार, विश्वस्त प्राची देशपांडे, वृषाली देशपांडे, उमेश जाधव आदी उपस्थित होते.