-रवींद्र धंगेकरांचा उत्पादन शुल्क अधीक्षकांना संतप्त सवाल
-धंगेकरांनी वाचून दाखवली हप्तेखोरीची यादी
-शहरात पहाटेपर्यंत चालणारे पब आणि बार कोणाच्या आशिर्वादाने चालतात, हा प्रश्न ऐरणीवर
पुणे : कल्याणी नगर येखील अपघात प्रकरणानंतर शहरात अवैधरित्या चालणाऱ्या पब आणि ड्रग्जच्या मुद्यावरुन रान उठवणारे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोमवारी (ता. २७) शहरातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या दोघांनी उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांना धारेवर धरले.
आमदार रवींद्र धंगेकर यांनी तुम्ही पापं करताय, तुम्हाला लय समजतं का, तुम्ही दर महिन्याला ७० ते ८० लाख हप्ता घेता, याची यादी माझ्याकडे आहे. तुम्ही स्वत:ला शहाणे समजता का, तुम्ही पुणे उद्ध्वस्त केलंय, तुम्हाला लाज कशी वाटत नाही?, अशा एकापाठोपाठ प्रश्नांची सरबत्ती रवींद्र धंगेकर यांनी केली. यावेळी रवींद्र धंगेकर यांनी हप्ते घेणार्या उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांची नावे देखील वाचून दाखवली. कॉन्स्टेबल सागर सुर्वे, समीर पडवळ, तात्या शिंदे, स्वप्नील दरेकर, बाळासाहेब राऊत, राहुल रामनाथ, अधीक्षक चरणसिंह राजपूत हे तुमच्या आशिवार्दाने हप्ते घेतात असा आरोप यावेळी धंगेकरांनी केला. यासह काही खासगी व्यक्ती देखील वसुलीचे काम करतात असेही धंगेकर म्हणाले. पुणे महानगरपालिकेची परवानगी नसेल तर तुम्ही एक पत्रा देखील टाकू शकत नाही, मग शहरातील पब सकाळी चार वाजेपर्यंत कसे चालतात? याचा जाब विचारण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत, असे रवींद्र धंगेकर यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावले. आम्ही आता ही गोष्ट शांतपणे सांगायला आलो आहोत, यापुढे आम्ही तुम्हाला शांतपणे सांगणार नाही. आमच्याकडे तुमच्या सगळ्या गोष्टींची माहिती आहे, असा इशाराही रवींद्र धंगेकर यांनी दिला.
खोट्या नोटांचा बॉक्स दिला भेट
धंगेकर यांनी उत्पादन शुल्क अधिकाऱ्याना खोट्या नोटा भरलेल्या भला मोठा बॉक्स भेट दिला.
महायुतीचे मंत्री रडारवर..
कल्याणी नगर अपघात प्रकरणानंतर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे राज्य सरकारविरोधात रान उठवत आहेत. सोमवारी त्यांना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांची साथ मिळाली. सुषमा अंधारे यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या कारभारावरून महायुतीच्या मंत्र्यांना धारेवर धरले. पुण्यात दर १५ दिवसांनी गांजा आणि ड्रग्ज सापडत असेल तर उत्पादन शुल्क विभाग काय करतोय? संबंधित खात्याच्या मंत्र्यांचा अधिकाऱ्यांवर वचक नाही का? अधिकारी त्यांचे आदेश ऐकत नाहीत का?, असे सवाल विचारत सुषमा अंधारे यांनी मंत्री शंभुराज देसाई यांना लक्ष्य केले. आम्ही काही बोललो तर एक्साईज खात्याचे मंत्री आणि आरोग्य प्रशासन विभागाचे मंत्री आमच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्याची भाषा करतात. आमच्यावर केस करण्यापेक्षा तुमच्या अधीन असणाऱ्या अधिकाऱ्यांना बोला, असे खडेबोल सुषमा अंधारे यांनी संबंधित मंत्र्यांना सुनावले.