मुंबई-रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी केवळ स्टंटबाजी केली असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते तथा मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात जात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रशासनातील अधिकारी हे वसुली करत असल्याचा आरोप केला होता. या आरोपांवर आता मंत्री शंभूराजे देसाई यांनी देखील पलटवार केला आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडे काही पुरावे असतील तर त्यांनी जिल्हा प्रशासनाला सादर करावे. पुरावे न देताच ते केवळ आरोप करत असल्याचे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे. या प्रकरणी आपण धंगेकर यांची विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार करणार असल्याचेही देसाई यांनी म्हटले आहे.विधानसभा सदस्य रवींद्र धंगेकर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागात कार्यालयात जाऊन जो प्रकार केला, तो एक स्टंटचा भाग आहे. त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी ते शासनाकडे द्यावेत. जिल्हाप्रमुख म्हणून जिल्हाधिकारी किंवा पोलिस आयुक्त, शासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्याकडे त्यांनी पुरावे द्यावेत. या सर्व प्रकरणाची कसलीही चौकशी करण्याची आमची तयारी आहे. या प्रकरणी कोणालाही पाठीशी घातलेले नाही. आजपर्यंत घातलेले नाही आणि या पुढेही घालणार नाही, अशा शब्दात मंत्री शंभूराजे यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर पलटवार केला आहे.
पुण्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आंदोलन केले होते. हे आंदोलन रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी केले असून या वेळी त्यांनी उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांवर अनेक आरोप केले आहेत. जिल्हा प्रशासन वसुली करत असलेल्या हप्त्यांची यादीच सुषमा अंधारे यांनी वाचून दाखवली. या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची वसुली केली जात असल्याचा आरोप आमदार धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी केला आहे. मात्र, या प्रकरणात एकही पुरावा नसताना आरोप होत असल्याचे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.