पुणे : श्रीरामजन्माचा आनंदोत्कट क्षण… राम, सीता, लक्ष्मण वनवासाला निघाल्यानंतर अयोध्यावासीयांच्या भावनांचा उठलेला कल्लोळ… शबरीची कथा… वाल्याकोळी…जटायू बंधूची कथा, राज्याभिषेक, स्वयंवर, पर्णकुटी, शूर्पणखा, सीताहरण, वानरसेना, हनुमानाच्या भेटीपासून ते सीतेची लंकेतून सुटका करीत रावणाच्या वधापर्यंत, एक, दोन नव्हे तर गीतरामायाणातील तब्बल विविध प्रसंग… नंतर पुन्हा अयोध्येमध्ये आगमन आणि पुन्हा राज्याभिषेक, असे नृत्य, नाट्य व संगीताच्या माध्यमातून अवघ्या दोन तासात १२० कलावंतांनी नृत्यावर आधारित रामायण उलगडले. उपस्थित पुणेकर रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांचे कौतुक केले. निमित्त होते, अनुभव ‘अद्वितीय राम – एक नृत्यमय कथा’ हा १२० कलावंतांचा सहभाग असणारा नृत्यावर आधारित रामायणाचा शुभारंभाचा प्रयोगाचे. शनिवारी बालगंधर्व रंगमंदिरात तुडुंब भरलेल्या रसिक श्रोत्यांच्या साक्षीने प्रयोग झाला. जय श्रीरामचा जयघोष, फुलांची उधळण करीत प्रयोगाला पुणकेर रसिकांनी दाद दिली.श्री गणेशाची आरतीने रामायणाच्या सादरीकरणाला सुरवात झाली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व नटराजन मूर्तीचे आणि श्रीरामाच्या प्रतिमचे पूजन करण्यात आले. ओंमकार शिंदे यांचे आई-वडील विवेक व मंगला शिंदे, पुणे फेस्टिव्हलचे कृष्णकुमार गोयल, डान्स कोरिओग्राफर आशिष पाटील यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. दिग्दर्शक ओम डान्स अॅकडमीचे ओंमकार शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या एकूण २ तासांच्या या नृत्यरामायणात ओम डान्स अॅकडमीतील ४ वर्षे ते ६० वर्षे या वयोगटातील १२० स्त्री – पुरुष कलावंतांनी सहभाग घेत रामायणातील विविध घटनाप्रसंग कलाकारांनी उलगडले. लहानग्यांसह साठ वर्षेपर्यंतच्या कलाकारांच्या कलाविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. रामजन्मापासून अनेक प्रसंग कलाकारांनी आनंदोत्साहात सादर केले. पुणेकर रसिकांकडून कलाविष्काराला साथ दिली जात होती. यावेळी “जय श्रीराम’च्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भारून निघाले. या नृत्यरामायणाची सुरुवात नारदमुनी आणि वाल्मिकी ऋषी यांच्या निवेदनातून फ्लॅशबॅक पद्धतीने झाली. यामध्ये राज्याभिषेक, स्वयंवर, पर्णकुटी, शूर्पणखा, सीताहरण, शबरी, हनुमान, हनुमान आणि सीता, रावण, वानरसेना, राम – रावण युद्ध, अयोध्येमध्ये आगमन आणि पुन्हा राज्याभिषेक असे एकूण १२ प्रसंग नृत्यावर आधारित सादर करण्यात आले. यातील नृत्ये फ्रीस्टाईल इंडियन क्लासिकल धर्तीवर आहे. संकल्पनेचे जनक व दिग्दर्शक ओम डान्स अॅकडमीचे ओंमकार शिंदे म्हणाले, गीतरामायण आणि चित्ररामायण यानंतर आता नृत्यरामायण आहे. अयोध्येमध्ये या नृत्यरामायणाचा विशेषशो देखील आयोजित केला जाणार आहे. पुणेकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आनंद देणारा आहे. अयोध्येतील प्रभू श्रीराम यांच्या मंदिराच्या निर्मितीमुळे नृत्यावर आधारित रामायण, माझ्या ओम डान्स अॅकडमीतर्फे सादर करावे ही कल्पना मला सुचली आणि त्यातूनच ‘नृत्यरामायण’ सादर केले, असल्याचे यावेळी ओंमकार शिंदे यांनी सांगितले. या नृत्यरामायणात यापूर्वी प्रसारित मराठी व हिंदी गाणी चपखलपणे वापरण्यात आली. याची संहिता हेमंत देशमुख यांनी लिहिली आहे. वेशभूषा वीणा देवकुळे आणि कलाक्षेत्र तसेच मेकअपइंटरनॅशनल ब्युटी स्कूल यांनी केले आहे. या सर्व कार्यक्रमाचे नृत्य दिग्दर्शन ओंमकार शिंदे यांनी केले आहे.पुणे फेस्टिवल चे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि डान्स कोरिओग्राफर आशिष पाटील यांनी दिग्दर्शक ओमकार शिंदे यांच्या रामायणाला शुभेच्छा दिल्या. त्यांच्या कलाकारांचे कौतुक केले. आज भाग्याचा दिवस आहे. आजपर्यंत टीव्हीवर व पुस्तकातून रामायण वाचले. आता नृत्य, संगीतातून रामायण रसिकांना अनुभवता येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात प्रयोगाला रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद मिळेल, अशी शुभेच्छा यावेळी त्यांनी दिली.
१२० कलावंतांनी नृत्यमय कथेतून उलगडले रामायण
Date: