सांघिक टेबल टेनिस स्पर्धा :पीवायसी जिमखान्यास दुहेरी मुकुट
पुणे – दिनांक २६ मे- डेक्कन जिमखाना क्लबने पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने (पीडीटीटीए) आयोजित केलेल्या जिल्हा स्तरीय सांघिक अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेतील खुला गट तसेच कनिष्ठ (१७ वर्षाखालील) गटात पीवायसी जिमखानाच्या संघांनी विजेतेपद पटकावीत दुहेरी मुकुट मिळविला.
डेक्कन जिमखाना क्लब येथे आयोजित केलेल्या या स्पर्धेतील सतरा वर्षाखालील गटात पीवायसी ‘अ’ संघाने अंतिम सामन्यात आपल्याच ‘क’ संघाचा ३-० असा पराभव केला. त्यावेळी त्यांच्याकडून प्रणव घोलकर याने अनुज फुलसुंदर याला ११-४,११-८,११-९ असे सरळ तीन गेम्स मध्ये पराभूत केले. दुसऱ्या लढतीत जान्हवी फणसे हिला अली कागदी याच्याविरुद्ध विजय मिळवताना झगडावे लागले. हा सामना तिने १२-१०,९-११, ११-२, १४-१२ असा जिंकून पीवायसी संघास २-० अशी आघाडी मिळवून दिली. या सामन्यापाठोपाठ जान्हवी हिने श्रिया शेलार हिच्या साथीत अनुज फुलसुंदर व विहान राऊत यांना ११-६,११-८,११-९ असे पराभूत करीत संघाच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या गटामध्ये अली कागदी याला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू हे पारितोषिक देण्यात आले.
या सामन्याच्या तुलनेमध्ये खुल्या गटाचा अंतिम सामना विलक्षण चुरशीने खेळला गेला. पीवायसी ‘क’ संघाने अंतिम सामन्यात डेक्कन जिमखाना ‘अ’ संघावर ३-२ अशी मात केली. त्यावेळी पहिल्या लढतीत पीवायसी संघाच्या शुभंकर रानडे यांनी ईशान खांडेकर याला ११-१३,११-५, ११-९,८-११,११-३ असे संघर्षपूर्ण लढतीनंतर पराभूत केले. मात्र नंतरच्या लढतीत पीवायसी संघाच्या जय पेंडसे याला नील मुळ्ये याच्याकडून ८-११,५-११, ९-११ अशी हार पत्करावी लागली. दुहेरीत पेंडसे याने भार्गव चक्रदेव याच्या साथीत ईशान खांडेकर व वैभव दहीभाते यांना ११-५,११-७,११-५ असे हरविले आणि पीवायसी संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. डेक्कन जिमखाना ‘अ’ संघाचा डावखुरा खेळाडू नील मुळ्ये याने शुभंकर याला ११-४,५-११,११-९,१२-१० असे पराभूत करीत सामन्यात २-२ अशी बरोबरी साधली. त्यामुळे भार्गव व वैभव यांच्यातील निर्णायक एकेरीच्या लढतीबाबत उत्कंठा निर्माण झाली. दोन्ही खेळाडूंनी सुरेख खेळ करीत सामना रंगतदार केला. ही लढत भार्गवने ११-७,९-११,२१-१९,११-४ अशी जिंकून पीवायसी संघास विजेतेपद मिळवून दिले. या गटामध्ये नील मुळ्ये हा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मानकरी ठरला.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ राजीव बोडस, स्मिता बोडस, श्रीराम कोनकर, आनंद काळे, आशिष बोडस, मिहीर केळकर, उपेंद्र मुळ्ये, दीपेश अभ्यंकर आदी संघटकांच्या हस्ते झाला.