- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचा पुढाकार
पुणे : आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज असलेल्या ज्येष्ठ गायिका सुषमा देवी म्हणजे चालता बोलता भिमागीतांचा वारसाच. त्यांच्या गायकीने तळागाळातील जनते पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकारांचे विचार पोहोचले. एक काळ असा होता की त्यांच्या भीमागीतांच्या कार्यक्रमांना लोक लाखोंच्या संख्येने गर्दी करत. मात्र त्यानंतर सोशल मीडिया आला, अनेक नवीन गायक उदयास आले अन् काळाच्या ओघात सुषमा देवी मागे पडल्या. आज त्यांच्यावर हालाकीची परिस्थिती ओढावली असून घराचे वीज बील भरण्यासाठी देखील त्यांच्याकडे पैसे नाहीत. याची दखल घेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या माध्यमातून पुणेकरांच्या वतीने सुषमा देवी यांना आर्थिक मदतीचा हात देण्यात आला आहे.
अर्थपूर्ण गाणी, बुलंद आवाज आणि सुमधुर संगीताच्या जोरावर सुषमा देवी यांचे नाव केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात झाले. मात्र रोजंदारी मिळाल्या प्रमाणे मानधन मिळाल्याने त्यांना उमेदीच्या काळात पुरेसा पैसा देखील मिळविता आला नाही. अन् आज त्यांच्यावर हालाकीची परिस्थिती ओढावली आहे. मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या सुषमा देवी यांचे गायकी शिवाय अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. याची गंभीर दखल डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी घेतली. नुकतेच भगवान गौतम बुध्द जयंती निमित्त पुणे विद्यापीठ परिसरातील तथागत गौतम बुद्ध विहार येथे आयोजित धम्म संध्या कार्यक्रमात महोत्सव समितीच्या वतीने एक लाख रुपयांचे अर्थसाहाय्य करून मदतीचा हात देण्यात आला आहे. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, कार्यक्रमाच्या आयोजक तथा पुण्याच्या माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, विठ्ठल गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
वयाच्या आठव्या वर्षा पासून सुषमा देवी यांनी भीमागीते गायला सुरूवात केली. पुढे लग्नानंतर त्यांचे पती संगीतकार मोटघरे यांची त्यांना बहुमूल्य साथ मिळाली. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कवी – गीतकार वामनदादा कर्डक, जेष्ठ दिवंगत गायक – संगीतकार श्रावण यशवंते, गोविंद म्हशीलकर, दत्ता जाधव, प्रकाशनाथ पाठक, प्रतापसिंग बोडदे, वैशाली शिंदे यांच्या सोबत सुषमा देवी यांनी काम केले. उमेदीच्या काळात सुषमा देवी यांची कारकीर्दी या कलावंतांच्या साथीने बहरास आली. सुषमा देवी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई घराघरात पोहचवण्याचे काम केले. ‘भीमाच्या नावाचं कुंकू लावील रमानं ..’, ‘गौतम गौतम पुकारू..’, ‘काखेत लेकरू हातात झाडणं ..’ आदी सुषमा देवी यांची गाणी प्रसिद्ध आहेत.