वंचित विकास संस्थेतर्फे ‘अभया’चा दहावा वर्धापनदिन व दशकपूर्ती ‘अभया सन्मान’ सोहळा
पुणे : “समाजातील प्रत्येक महिला विविध घाव सोसत असते. प्रत्येकीच्या संघर्षाचे स्वरूप वेगळे असेल. पण जीवनात संघर्ष येतोच. अशावेळी आपल्या जगण्यातील सकारात्मकता, धैर्याने सामोरे जाण्याची वृत्ती आणि मनातील कणखरपणा परिस्थितीशी दोन हात करण्याची उमेद देतो,” असे मत लेखिका श्रीमती माधुरी ताम्हणे यांनी व्यक्त केले.
वंचित विकास संचालित ‘अभया’ या एकल महिलांच्या मैत्रीगटाचा दहावा वर्धापनदिन व दशकपूर्ती अभया सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या. कर्वे रस्त्यावरील अश्वमेध हॉलमध्ये झालेल्या उन्मेष प्रकाशनच्या संचालक श्रीमती मेधा राजहंस, वंचित विकासचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, कार्यवाह संचालक मीना कुर्लेकर, संचालिका सुनीता जोगळेकर, मीनाक्षी नवले आदी उपस्थित होते.
परिस्थितीशी दोन हात करुन यशस्वी जिवन जगणाऱ्या महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला. बिबट्याशी झुंज देणाऱ्या सुनीता बनकर, तृतीयपंथी म्हणून येणार्या अडचणींना तोंड देत तृतीयपंथीयांच्या आर्थिक स्थितीवर पीएचडी करणाऱ्या मिलिंद उर्फ मिलन लबडे, पतीच्या निधनानंतर अडचणींवर मात करून स्वतःला व कुटुंबाला उभे करणार्या दैवशाला थोरबोले, ज्ञानदानातून हजारोंचे आयुष्य घडवणाऱ्या शोभा वाईकर, मुलांना वाढवताना संघर्ष करणाऱ्या वंदना अवघडे यांना अभया सन्मान, तर अयोध्येतील श्रीराम मंदिरात शंख वादन करणार्या दीपिका जंगम यांना विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. ‘अभया’च्या कार्याची माहिती देणाऱ्या पुस्तकाचेही प्रकाशन झाले.
माधुरी ताम्हणे म्हणाल्या, “एकटेपणा वाट्याला आला, तरी खचून जाता कामा नये. आपल्यासारख्या इतरांचा आपण आधार होऊ शकतो. एकमेकींच्या साहाय्याने जगण्याचा हा प्रवास पुढे घेऊन जात येतो. समाजाने एकल महिलांना वेगळेपणाची वागणूक देणे थांबवायला हवे. सर्वांना समान अधिकाराची कृती प्रत्येकाने अंमलांत आणायला हवी.”
मेधा राजहंस म्हणाल्या, “एकमेकींना भावनिक आधाराची गरज असते. समाजात भगिनीभाव रुजायला हवा. एकटेपणा येण्याचे प्रमाण वाढत आहे. नात्यांमध्ये तणाव निर्माण होताहेत. अशावेळी आपण एकमेकांना आधार देऊन परस्पर स्नेहबंध दृढ केला, तर जीवनात होणार्या संघर्षावर मात करता येईल.”
मीना कुर्लेकर म्हणाल्या, “विलास चाफेकर यांच्या मार्गदर्शनात अभया उपक्रमाची सुरुवात झाली. आज दहा वर्षांमध्ये असंख्य महिला या उपक्रमात जोडल्या गेल्या. अनेकींना आधार मिळाला. काहींच्या संघर्षातून प्रेरणा मिळाली. भावनिक बंध तयार झाले. अभयाची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी भविष्यात काम सुरु राहील.
देवयानी गोंगले यांनी सूत्रसंचालन केले. मीना कुर्लेकर यांनी अभया सन्मानार्थीच्या संघर्षगाथा सांगितल्या. मीनाक्षी नवले, चैत्राली वाघ, स्नेहल मसालिया, तेजस्विनी थिटे, मीनाक्षी नागरे यांच्यासह वंचित विकासच्या टीमने कार्यक्रमाचे संयोजन केले.