पुणे-इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. या घटनेत पाटील यांना धक्काबुक्की, तर गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. तहसील कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर ही घटना घडली इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील शुक्रवारी सकाळी 11 च्या सुमारास शहरातील जुन्या पुणे – सोलापूर मार्गावरून शासकीय वाहनातून (MH 42 AX 1661) आपल्या कार्यालयाकडे जात होते. रस्त्यात संविधान चौकात विना क्रमांकाच्या चारचाकी गाडीतून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांचा वाहन चालक मल्हारी मखरे यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून गाडीवर लोखंडी रॉडने हल्ला केला. त्यानंतर श्रीकांत पाटील यांच्यावरही काठीने हल्ला चढवला. त्यात ते किरकोळ जखमी झाले. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. हा हल्ला कुणी व कशासाठी केला? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला.उल्लेखनीय बाब म्हणजे तहसीलदार श्रीकांत पाटील आपल्या कारवाईसाठी ओळखले जातात. उजनी पात्रात बुडालेल्या 6 जणांच्या शोधासाठी त्यांनी इंदापूर तालुक्यातील कळाशी गावात सलग 2 दिवस ठाण मांडले होते. यावेळी त्यांनी बेपत्ता झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांची समजूत घालण्याचाही प्रयत्न केला होता.