पुणे– शहरातील कल्याणीनगर भागात रविवारी पहाटे एका भरधाव कारने तरुण-तरुणीला चिरडल्याचा प्रकार घडला आहे. गेल्या काही वर्षापासून नाईट लाईफ संस्कृतीमुळे अनेक तरुण-तरुणी व्यसनाच्या अधीन होताना दिसत आहेत. मद्यसेवन केलेली अनेक तरुण-तरुणी मध्यरात्रीच्या सुमारास आपली वाहने सुसाट वेगाने चालवत आहेत. यातूनच अशा दुर्दैवी घटनांना आपणाला सामोरे जावे लागत आहे. यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे मत महायुती शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केली आहे.
अशाप्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी उपाययोजना कराव्यात यामध्ये पुण्यात सुरु असलेली नाईट लाईफ संस्कृती थोपविण्यासाठी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पब, बार यांच्यावर कारवाई करण्यात यावी.पबमध्ये सुरु असणाऱ्या पायऱ्यांसाठी डीजेवर लावण्यात येणारी गाणी ही अतिशय अश्लील पद्धतीची असतात. त्यामुळे त्यावर लगाम घातला पाहिजे.मध्यरात्री शहरातील अनेक चौकाचौकात तरुण तरुणी गर्दी करुन हुल्लडबाजी करत असतात. त्यावर चाप बसविण्यासाठी पोलिसांची गस्त वाढवणे. कोरेगाव पार्क ते विमाननगर, मुंढवा यांसह पुणे शहराच्या आसपासच्या अनेक परिसरातील पब हे रात्री ८ वाजेनंतर सुरू होतात. त्यानंतर अनेक तरुण-तरुणी पार्टी नावाखाली हुल्लडबाजी करत असतात. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पब चालकांना वेळेचे बंधन घालावे. त्री बेदरकारपणे गाडी चालणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.नाईट लाईफमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा विचार देखील आवश्यक आहे.
नाईट लाईफ मध्ये सहभागी तरुण तरुणी नशेच्या अमलाखाली गेल्याने; त्यांना कसलेही भान राहत नाही. त्यामुळे अनेकवेळा हे तरुण-तरुणी रस्त्यावरच अश्लील चाळे करताना, नाचताना, धिंगाणा घालताना व वेड्यावाकड्या गाड्या चालवताना दिसतात. अनेक वेळा या तरुणी उशिरा रात्री ‘पार्टी’ संपवून घरी परतण्यासाठी एकट्याच रिक्षा अथवा कॅबची वाट पाहत रस्त्यावर उभ्या असतात. या सर्व प्रकारांमुळे या तरुणतरुणींच्या जिवाबरोबरच इतर सामान्य नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे.