– पुणे, नांदेड, बीड, औरंगाबादसह त्रिपुरा येथील 20 बुद्ध विहारांना बुद्धरूपांचे वितरण
पुणे : बुद्ध पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर दि महाचुला अलुमिनी असोसिएशन, बँकॉक, थायलंड, रेंजहिल्स रहिवासी सभा व रेंजहिल्स रहिवासी महिला सभा यांच्या संयुक्त विद्यमाने शताब्दी बुद्ध विहार येथे ‘बुध्दरूप (बुद्धमूर्ती) प्रदान सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले होते. थायलंड येथून आलेल्या साडे पाच फुट ऊंच, अतिशय देखण्या, आकर्षक अशा या पितळी धातूंच्या बुद्धरूपांचे पुणे शहर, पुणे जिल्ह्यासह नांदेड, महाड, बीड, छत्रपती संभाजीनगर आणि त्रिपुरा येथील 20 बुद्ध विहारांना वितरण करण्यात आले.
यावेळी भंते नागघोष (पुणे) भंते हान (व्हिएतनाम), भंते संघदूता (अरुणाचल प्रदेश), भंते धम्मानंद (पुणे) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण (विभाग प्रमुख विस्तार व सेवा योजना, बार्टी), प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. या प्रसंगी धम्म प्रसारक भारतीय सत्यशोधक महासंघ, लातूरचे डी. एस. नरसिंगे आणि सूर्यप्रकाश फाऊंडेशन, बीडचे प्रकाशसिंग तुसाम यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
डॉक्टर सत्येंद्रनाथ चव्हाण यांनी बार्टी मधील यूपीएससी, एमपीएससी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व त्या बद्दलच्या विविध योजना त्याचप्रमाणे भविष्यातील प्रकल्पांची माहिती देऊन तसेच बाबासाहेबांच्या विचारांची व गौतम बुद्धांनी दिलेल्या धम्माच्या विचारांची आजच्या जीवनातील आवश्यकता प्रतिपादित करून उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शन केले
सत्काराला उत्तर देताना डी. एस. नरसिंगे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दाखविलेला तथागत गौतम बुद्धाचा मार्ग हा केवळ एका जातीसाठी नव्हे तर मानव मुक्तीचा मार्ग आहे. दलित समाजाने एक व्हावे यासाठी डॉ. आंबेडकर आग्रही होते, त्यांनी 11 मांग – महार एकता परिषदा घेतल्या होत्या, मात्र महात्मा गांधीच्या हरिजन सेवक संघाने या दोन समाजाने एकत्र येऊ नये यासाठी सातत्याने प्रयत्न केले. काही लोक जाणीवपूर्वक बुद्ध एका समाजा पुरतेच मर्यादित असल्याचे बहुजन जनतेच्या मनात पेरत आहेत, मात्र बुद्धीझम ही जागतिक फिलॉसॉफी आहे, मानवाच्या कल्याणासाठी हे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी समाजाने हे समजून घेतले पाहिजे.
प्रकाशसिंग तुसाम, बीड यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, आणि धार्मिक विधी संचालन आयु कलावंत पवार, अध्यक्ष, रेंजहिल्स रहिवासी सभा यांनी केले.