पुणे : चेन्नईच्या ४० पेक्षा जास्त नृत्यकलाकारांचा समावेश असलेले ‘अग्रे पश्यामी’ हे नृत्यनाट्य पुण्यात प्रथमच ‘नृत्ययात्री’ संस्थेतर्फे आयोजित करण्यात येत आहे.दि.२५ मे रोजी संध्याकाळी ६:३० वाजता अण्णा भाऊ साठे सभागृह(पद्मावती) येथे हे नृत्यनाट्य सादर होणार आहे.
श्रीविष्णूच्या कूर्म,वराह,नृसिंह,राम आणि कृष्ण या अवतारांचं वर्णन भरतनाट्यम,मोहिनीअट्टम,कुचीपुडी आणि कृष्णाट्टम कली या नृत्यशैलींच्या माध्यमातून या नृत्य नाट्यात साकारलं जाणार आहे.संस्कृत,तमिळ,मल्याळी,कानडी,तेलगू आणि मराठी अशा ६ भाषेतील निवडक रचनांना १० प्रतिभावान संगीतकारांनी दिलेलं ४० वेगवेगळ्या रागमालांमधील संगीत,अतिशय सुंदर रंगभूषा,वेशभूषा ही नृत्य रसिकांसाठी खास पर्वणी ठरणार आहे.’नृत्ययात्री’च्या संस्थापक मेघना साबडे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
या निमित्ताने शास्त्रीय नृत्याच्या इतिहासात प्रथमच ‘नारायणीयम’ हे नृत्य नाट्याच्या स्वरूपात सादर होणार आहे.’नारायणीयम्’ नावाच्या संस्कृत काव्यावर हे नृत्यनाट्य आधारित आहे.सुमधुर अशा संस्कृत काव्यरचनांसाठी ओळखले जाणारे नारायण भट्टातीरी नावाचे एक प्रतिभावान कवी केरळमध्ये सोळाव्या शतकात होऊन गेले.
त्यांनी भागवत पुराण संक्षिप्त स्वरूपात आणून एकूण दहा दहा श्लोकांच्या शंभर दशकांमध्ये त्याची केलेली काव्यरचना म्हणजेच ‘नारायणीयम्’ हे काव्य आहे.विलक्षण साहित्यिक गुणवत्ता असलेलं हे काव्य भक्तीरसाने ओथंबलेलं आहे.संस्कृत साहित्यात उच्च स्थान असलेलं हे काव्य केरळ आणि तमिळनाडू मधील एक लोकप्रिय धार्मिक ग्रंथ म्हणून प्रसिद्ध आहे.या काव्याचे पठण केल्यास उत्तम आरोग्य आणि सुख समृद्धी लाभते अशी भक्तांची श्रद्धा आहे.
प्रसिद्ध वक्ते,प्राचीन वैदिक ग्रंथांचे लेखक, संशोधक आणि दिग्दर्शक श्री दुष्यंत श्रीधर यांनी या नृत्यनाट्याची संहिता तयार केली आहे.भरतनाट्यम नृत्य शैलीतील प्रसिद्ध गुरु श्रीमती अनिता गुहा यांची नृत्यसंरचना आहे.संगीत नाटक अकादमी पुरस्कारप्राप्त डॉ. राजकुमार भारती यांची संगीतरचना आहे.साऊंडस्केप डिझाइन श्री साई श्रवणमचे आहे.