आम जनतेच्या संतापामुळे अखेरीस कारवाई
पुणे- पुण्यातील गर्भ श्रीमंत बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांच्या मुलाने मध्यरात्री आपल्या भरधाव कारने दोघांना चिरडले. शहरातील कल्याणीनगर येथील परिसरात ही दुर्घटना घडली.या घटनेनंतर संतप्त जमावाने आरोपीला चांगलाच चोप दिला आणि त्याला येरवडा पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर 15 तासांनी त्याला जामीन मंजूर करण्यात आला. सर्वात प्रथम माय मराठी ने या मुलाच्या हाती गाडी देणाऱ्या त्याच्या पालकांवर गुन्हा का दाखल केला नाही ? आणि विना रजिस्ट्रेशन गाडी देणाऱ्या डीलर वर का गुन्हा दाखल केला नाही ? अल्पवयीन मुलांना पब मध्ये दारू देणाऱ्या पब वर का कारवाई नाही ? असे प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर आज पोलिसांनी कारवाई सुरु केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीचे वडील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांच्यावर नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अल्पवयीन मुलांना दारू पुरवणाऱ्या बारबद्दल स्थानिकांनी उपस्थित केलेल्या चिंतेनंतर, पुणे उत्पादन शुल्क विभागाने अल्पवयीन मुलांना दारू पुरवल्याबद्दल आणि आवश्यक नियामक आवश्यकतांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल दोन बार मालकांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यामध्ये सागर चोरडिया आणि घोरपडी येथील ट्रिलियम सिक्युरिटीजचे प्रल्हाद भुतडा यांच्याविरुद्ध ही चार्जशीट दाखल करण्यात आली आहे.
यामध्ये हद्द म्हणजे आरोपी आणि त्याच्या नातेवाईकांनी भूक लागली म्हणून डझनभर पिझ्झा पोलीस ठाण्यात मागवले होते असा आरोपी मृतांच्या नातेवाईकांनी केला होता. तसेच आम्ही मुलगा मद्य पिल्याने त्याची ब्लड टेस्ट घ्या, असे म्हणताच पोलिसांनी तुमचेच रक्त काढतो आता असा दम भरला,’ असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.”आमचे पुण्यात कोणीही नातेवाईक नाहीत. तसेच येथे कोणाशी ओळखही नाही. पोलिसांचे एकंदर वर्तन बघता ते आरोपीच्या बाजूने भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. यामुळे आम्हाला न्याय मिळेल,’ असे वाटत नसल्याची प्रतिक्रिया मृताच्या नातेवाईकांनी व्यक्त केली.
सदरील आरोपी हा पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा आहे. तो नुकताच बारावी पास झाला आहे. मित्रांसोबत त्याने एका हॉटेलमध्ये पार्टी केली. यानंतर तो पबमध्ये गेला होता. पार्टी संपल्यावर चालकाला शेजारच्या सीटवर बसवले होते. मद्याच्या नशेत त्याने गाडी भरधाव चालवली. ट्रम्प टॉवर समोर आल्यावर त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटून अपघात झाला. त्याच्या वडिलांनी नुकतीच ही आलिशान कार विकत घेतली होती, अशी माहिती येरवडा पोलिसांकडून देण्यात आली आहे.
या अपघातातील मृत युवक अनिस यांचे कुटुंबिय मध्य प्रदेशात व्यावसायिक आहेत. अनिस आणि त्याचा चुलत भाऊ हे दोघेच नोकरीनिमित्त घर सोडून बाहेर रहात आहेत. पालकांनी अनिसला महिनाभर घरी बोलावले होते. मात्र, त्या अगोदरच ही घटना घडली. पुण्यात शिक्षण झाल्याने त्याने पुण्यातच नोकरी पत्करली होती. तर त्याचा छोटा भाऊही पिंपरीतील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. भावाच्या अपघाती मृत्यूने त्यालाही धक्का बसला आहे. “अनिसच्या आई-वडिलांना ही घटना नातेवाईकांनी सांगितली नाही. त्यांना कळू नये म्हणून गावाकडील नातेवाईकांनी टीव्ही बंद करुन ठेवला आहे तसेच त्यांचे मोबाइलही काढून घेतले आहेत. आता मृतदेह गावाला गेल्यावरच त्यांना कळेल,’ असे अनिसच्या चुलत भावाकडून सांगण्यात आले आहे.
अश्विनी ही “वर्क फ्रॉम होम’ करत होती .यामुळे तिच्या आईने तिला “थोडी घराबाहेर पडत जा, बाहेर फिरुन येत जा’ असा सल्ला दिला होता. यामुळे ती शनिवारी रात्री मित्रांबरोबर पबला गेली. जाताना तिने आईला फोनही केला होता. पबमधून बाहेर पडल्यावर थोडावेळ ती मित्रांबरोबर रस्त्याच्याकडेला गप्पा मारत थांबली होती. यानंतर तिला अनिसने रुमवर सोडण्यासाठी गाडीवर बसवले. पबचा रस्ता क्राॅस करताच लगेचच हा अपघात घडला. आपल्या मुलीच्या अपघाताची बातमी समजताच तिच्या कुटुंबियांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.
या अल्यपवयीन मुलाला या अटींवर केला जामीन मंजूर
- आरोपीला पंधरा दिवस ट्रॅफिक कॉन्सटेबल सोबत चौकात उभे वाहतुकीचे नियोजन करावे लागणार आहे.
- त्याला मानसोपचार तज्ञांकडून उपचार घ्यावे लागणार आहेत.
- त्याला भविष्यात अपघात झाल्याचे दिसल्यास अपघातग्रस्तांना मदत करावी लागेल.
पोलीस आयुक्त काय म्हणाले …
पुणे शहरात बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने भरधाव कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली आहे. या भयंकर अपघाताच्या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली असतानाच या प्रकरणांमध्ये राजकीय दबाव आणला गेला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.या प्रकारावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत सविस्तर माहिती दिली. पुणे पोलिसआयुक्त अमितेश कुमार म्हणाले, हे प्रकरण खूप गंभीर आहे. त्यामुळे गांभीर्याने पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात 304 अंतर्गत कलम लावण्यात आले आहे. मात्र आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला जामीन मिळाला. हा आरोपी अल्पवयीन आहे. त्यामुळे त्याला निरीक्षणगृहात ठेवण्यासाठी मागणी आम्ही केली होती, मात्र आमची ही मागणी फेटाळली आहे. आम्ही याविरोधात सत्र न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत.या मुलाचे वडील आणि त्याला दारु देणाऱ्या पबच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणीनगर, कोरेगाव पार्क भागातील पब आणि बारवर कारवाई करण्यासाठी एक्साईज डिपार्टमेंट सोबत काम करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं. कायद्यानुसार सर्व प्रक्रिया पोलिसांनी केली आहे, पोलिसांनी थातुरमाथूर कारवाई केली असं नाही. त्यामुळे कोणीही असं समजू नये. कोणालाही वाचविण्यात येणार नाही.विना नंबर प्लेट गाडी देणाऱ्या डिलरवर देखील कारवाई करण्यात येईल.या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस आयुक्तांकडे सोपविण्यात आला आहे.या प्रकरणात राजकीय दबाव आणण्यात येत असल्याचे बोलले जात आहे, यावरती बोलतांना पोलीस आयुक्त म्हणाले, या प्रकरणात पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजचाही तपास करण्यात येईल.कोणी राजकीय दबाव आणला का? हे यातुन समजेल. ते सर्वांच्या पुढे येईल.आज अनेक सामाजिक आणि राजकीय लोक भेटत आहेत, त्यांचे म्हणणे पण ऐकून उपाय केल्या जातील.या प्रकरणात कोझी बार आणि ब्लॅक बार या दोन बार चालकांवर कारवाई करण्यात येईल. हा मुलगा खरच अल्पवयीन आहे का? याचा तपास त्याच्या शाळेत जाऊन करण्यात येत आहे. मात्र हा मुलगा दारु पिऊन गाडी चालवत होता हे स्पष्ट आहे. असे देखील पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले