पुणे-एका हॉटेल व्यवसायिक तरुणाने आर्थिक वादातून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना महात्मा फुले पेठ परिसरात घडली आहे. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.शिवराज विजयकुमार वडलकोंडा (रा. महात्मा फुले पेठ,पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रोहित सुभाष भोंडे (रा. महात्मा फुले पेठ,पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत स्नेहल वडलकोंडा यांनी खडक पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवराज वडळकोंडा यांनी हॉटेल सुरू करण्यासाठी रोहितकडून पाच लाख रूपये काही दिवसांपूर्वी व्याजाने घेतले होते. त्यानंतर हॉटेलमध्ये ५० टक्के भागीदारी देण्यासाठी रोहितने शिवराजकडे सातत्याने तगादा लावला होता. त्यामुळे शिवराजने याबाबत विचार करून निर्णय घेण्यासाठी मुदत मागितली होती. मात्र, रोहितने कोणतीही पूर्वकल्पना न देता हॉटेलमधील साहित्याची परस्पर विक्री केली. त्यातून आलेले पैसे शिवराजला न देता, स्वतः वापर केला. त्यामुळे शिवराजला त्रास देऊन आत्महत्येस त्याने प्रवृत्त केले. शिवराजने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक पुढील तपास करत आहेत.