थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान तर्फे १८५७ च्या स्वातंत्र्य समराचे सेनानी ‘रणझुंझार नानासाहेब पेशवे’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : वसाहतवादाच्या छायेतून बाहेर पाडण्याचे काम आता सुरु झाले आहे. यापूर्वी इतिहासामध्ये भारतीय संदर्भ आलेले नाही. यामध्ये आपला वैचारिक आळस दिसून येतो. चांगल्या अर्थाने इतिहास बदलण्याचे कार्य सुरु झाले आहे. इतिहासातून अंतरदृष्टी, प्रेरणा व भविष्याचा वेध घेण्याची शक्ती मिळते, त्यामुळे आता राष्ट्रीय स्मारकांच्या यादीत स्थळांची नावे वाढविण्याचे काम पुरातत्व विभाग करीत असल्याचे माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.
थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान तर्फे इतिहास अभ्यासक मोहन शेटे लिखित १८५७ च्या स्वातंत्र्य समराचे सेनानी ‘रणझुंझार नानासाहेब पेशवे’ पुस्तकाचे प्रकाशन फर्ग्युसन महाविद्यालयातील नवलमल फिरोदिया सभागृहात आयोजित कार्यक्रमात झाले. नानासाहेब पेशवे यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला डॉ. आनंद भालेराव, अनिरुद्ध देशपांडे, पुष्कर पेशवे, एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, मोहन शेटे, कुंदनकुमार साठे, श्रीकांत नगरकर, चिंतामणी क्षिरसागर, उमेश देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते.
भूषण गोखले म्हणाले, मराठयांचा १५० वर्षांचा इतिहास दुर्लक्षित झाला आहे. तो इतिहास अभ्यासकांच्या माध्यमातून पुढे येत असल्याची बाब कौतुकास्पद आहे. शनिवारवाडयाची स्थिती काय झाली आहे? पुरातत्व विभागाला काय अडचण आहे? असे सांगत शनिवारवाडयात अनेक गोष्टी करता येतील. एका उत्तम पर्यटनस्थळ म्हणून त्याचा विकास होऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले.
मोहन शेटे म्हणाले, सन १८५७ च्या स्वातंत्र्य समराच्या वेळी पुणे देखील शांत नव्हते. नानासाहेब पेशवे यांनी काढलेले फतवे पुण्यातील विश्रामबाग वाडा, बुधवार वाडा आणि तुळशीबाग येथे लावण्यात आले होते, याचे उल्लेख आढळतात. नानासाहेबांचे व्यक्तिमत्व इंग्रजांना चक्रावून टाकणारे होते. त्यांच्या नेतृत्वाखाली देशात ४-५ हजार ठिकाणी उठाव झाले. नानासाहेबच्या मृत्यूबद्दल मत मतांतरे आहेत, त्याबद्दल संशोधन व्हायला हवे.
१८५७ च्या स्वातंत्र्यसमराची काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत युद्धभूमी होती. त्यामुळे नानासाहेब पेशवे यांना स्वातंत्र्य साम्राज्याचे शिल्पकार म्हणावे लागेल.
डॉ. आनंद भालेराव म्हणाले, महाराष्ट्राची भूमी ही संघर्षाची भूमी राहिली आहे. पहिल्या – दुसऱ्या शतकापासून प्रतिकाराची मालिका आजपर्यंत सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ही प्रतिकारची मालिका तीव्र झालेली दिसते. साहस, दृढ निश्चय व पराक्रमाने सामान्य माणूस देखील पेटून उठला. पानिपत मध्ये मराठ्यांनी स्वकियांसाठी रक्त सांडले. त्यावर अजूनही संशोधन सुरु आहे.
अजितकृष्ण तुकदेव म्हणाले, आम्ही १२ वर्षे बिठूर येथे जात आहोत. तेथे अनेक ठिकाणी खंडर झाले आहे. पेशवे, झाशीची राणी आणि तात्या टोपे यांनी १८१८ ते १८५७ मध्ये जे सोसले, ते आम्ही तेथील वातावरणातून पहात आहोत. संस्कृती आणि परंपरेचे रक्षण करणाऱ्या या योध्यांकरीता काहीतरी करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कुंदनकुमार साठे म्हणाले, पेशव्यांचा इतिहास दडपला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न पेशव्यांनी पूर्ण केले. त्यामुळे त्यांचा इतिहास समोर आणण्याचा प्रयत्न प्रतिष्ठान करीत आहे. भविष्यात पेशव्यांचे तैलचित्र विधानभवनात लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.