पुणे, दि.१३: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासाठी नियुक्त केलेले विशेष निवडणूक निरीक्षक धर्मेंद्र गंगवार आणि विशेष पोलीस निरीक्षक एन. के. मिश्रा यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथील विशेष नियत्रंण कक्षाला भेट देवून कामकाजाबाबत आढावा घेतला. त्यांनी नियंत्रण कक्षाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, समन्वयक अधिकारी प्रतिभा इंगळे, अनिल पवार आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात आज सकाळी ७ वाजल्यापासून पुणे, मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदान सुरु आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून स्वत: जिल्हाधिकारी वेबकास्टिंगच्या माध्यमातमून संपूर्ण मतदान प्रक्रियेवर वेबकास्टिंगद्वारे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मतदान केंद्रावर समस्या निर्माण झाल्यास त्यावर तात्काळ कार्यवाहीच्या सूचना नियंत्रण कक्षातून देण्यात येत होत्या. तिन्ही मतदारसंघातील ५० टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची सुविधा करण्यात आली.
विशेष निवडणूक निरीक्षकांनी स्वत: या वेबकास्टिंग यंत्रणेचे सूक्ष्म निरीक्षण केले. त्यांनी सुरू असलेल्या मतदानाची माहिती नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून घेतली. प्रसारमाध्यमात येणाऱ्या वृत्ताबाबत तात्काळ प्रतिसाद देत त्याबाबत स्पष्टीकरण तात्काळ माध्यमांना पाठविण्यात येत असल्याने निवडणूक प्रक्रियेविषयी सकारात्मक संदेश पोहोचत असल्याने याबाबतही श्री. गंगवार यांनी समाधान व्यक्त केले.