मतदान केंद्रात अथवा १०० मीटर परिसरात कोणत्याही प्रकारे फोटोग्राफी / व्हिडीओग्राफी करण्यासही मनाई
पुणे- पुणे लोकसभा निवडणुकीसाठी उद्या १३ मे रोजी मतदान होत असताना आज रात्री १२ नंतर म्हणजे ०० वाजल्यापासूनच पुणे पोलिसांनी मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल फोन ला बंदी घातली आहे तसेच मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या परिसरात फोटोग्राफी आणि व्हिडीओ शुटिंगसाठी हि बंदी घातली आहे .मात्र हे आदेश शासकीय अधिकारी, स्टाफ , पोलीस यांना लागू होणार नाही असेही नमूद केले आहे .पोलीस सह आयुक्त प्रवीण पवार यांनी हे आदेश काढले आहेत.
आपल्या आदेशात त्यांनी असे म्हटले आहे कि,’ज्याअर्थी, निवडणूक आयोग, भारत सरकार यांचे पत्र क्र.४३७/६/१/ECI/PN/23/2024 DATE 16.03.2024 अन्वये १८ व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूका घेण्याचा कार्यक्रम जाहीर केलेला असुन दिनांक १६/०३/२०२४ रोजी पासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आदर्श आचारसंहीता अस्तित्वात राहील. ३४ पुणे व ३६ शिरुर लोकसभा मतदार संघात मतदान दिनांक १३/०५/२०२४ रोजी होणार आहे.
पुणे पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात ३४ पुणे लोकसभा मतदार संघात २०८ वडगावशेरी, २०९ शिवाजीनगर, २१० कोथरुड, २१२ पर्वती, २१४ पुणे कॅन्टोंमेंन्ट व २१५ कसबा पेठ विधानसभा मतदार संघाचा तसेच ३६ शिरुर लोकसभा मतदार संघात १९८ शिरुर व २१३ हडपसर विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे.
निवडणूक आयोग, भारत सरकार यांचेकडून प्रसिध्द करण्यात आलेल्या नियमावलीप्रमाणे मतदानाच्या दिवशी मतदार हे मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल फोन घेवुन न जाणेबाबत सूचना दिलेल्या आहेत.
मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडणेसाठी, सार्वजनिक शांततेला व मालमत्तेला धोका पोहचू नये, मतदान केंद्राच्या परिसरात प्रचार होवु नये तसेच कायदा व सुव्यस्था अबाधित राखणेसाठी मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल फोन घेवुन जाणेस प्रतिबंध करणे जरूरीचे आहे, अशी माझी खात्री झालेली आहे.
त्याअर्थी, मी प्रविण पवार, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर मला फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ साठी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व मतदान केंद्रावर दि. १३/०५/२०२४ रोजी ००.०१ वा. पासून २४.०० वा पर्यत खालील आदेश देण्यात येत आहे.
• लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल फोन घेवुन जाण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.
• मतदान केंद्रात अथवा १०० मीटर परिसरात कोणत्याही प्रकारे फोटोग्राफी / व्हिडीओग्राफी करण्यास मनाई करण्यात येत आहे.
• मतदान केंद्र व मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचा ज्वलनशील पदार्थ, प्रतिबंधक वस्तु, आदर्श निवडणूक आचारसंहितेमध्ये नमुद केलेल्या नियमातील तरतुदीनुसार प्रतिबंधित बाबी घेवून जाण्यास मनाई करणेत येत आहे.
• उपरोक्त आदेश उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी व मतदार यांना लागू राहील.
• उपरोक्त आदेश मतदानासाठी नियुक्त केलेले शासकीय अधिकारी / स्टाफ / पोलीस यांना लागू राहणार नाहीत. सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भा.दं.वि. कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र राहील.