पर्वतीवरील श्री देवदेवेश्वराच्या २७३ वा स्थापना दिन : श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे यांच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण
पुणे : थोरले नानासाहेब पेशवे यांचे कार्य मोठे आहे. त्यांनी अनेक मोहिमा केल्या आहेत. त्यांच्या काळात मराठेशाही उच्च पदावर पोहोचली. किती युद्धे जिंकली यावरून त्यांच्या कर्तृत्वाचे आकलन होत नाही. त्यांचा विशाल दृष्टिकोन, राजनीति, प्रशासकीय कौशल्ये असे त्यांचे अनेक पैलू आहेत. परंतु काही ना काही कारणामुळे त्यांचे कार्य लोकांच्या नजरेआड गेले आहे, असे मत इतिहास अभ्यासक डॉ. उदय कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
पर्वतीवरील श्री देवदेवेश्वराच्या २७३ व्या स्थापना दिनानिमित्त श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे यांच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी देव देवेश्वर संस्थानाचे मुख्य विश्वस्त रमेश भागवत, विश्वस्त जगन्नाथ लडकत, सुधीर पंडित, आशिष कुलकर्णी उपस्थित होते. पेशव्यांचे वंशज पुष्करसिंह पेशवा यांच्या हस्ते अर्ध पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. ‘श्रीमंत नानासाहेब पेशवे आणि पुणे’ या विषयावर डॉ. उदय कुलकर्णी यांचे व्याख्यान यावेळी झाले.
डॉ. उदय कुलकर्णी म्हणाले, नानासाहेब पेशव्यांचा दरारा इतका मोठा होता की त्यांचे काम युद्ध न करता एका पत्रावर व्हायचे. नानासाहेबांवर अनेक आरोप, प्रत्यारोप झाले परंतु अभ्यास केल्यावर त्यांच्या प्रत्येक कृती मागे अर्थ असल्याचे लक्षात येते. कात्रज तलावातून पाणीपुरवठा, पर्वती मंदिर, सारसबाग, आंबील ओढा वळवणे, लकडीपूल मंदिर अशी अनेक मोठी कामे त्यांच्या काळात झाली. आज पुण्यात त्यांचे एकही स्मारक नाही, एकाही चौकाला किंवा रस्त्याला त्यांचे नाव नाही, ही खंत वाटते असेही त्यांनी सांगितले.
रमेश भागवत म्हणाले, पुण्यनगरीचा मानबिंदू असलेल्या पर्वतीवरील श्री देवदेवेश्वराच्या २७३ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे यांच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या ठिकाणी पुढच्या टप्प्यात युद्ध स्मारक देखील होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जगन्नाथ लडकत म्हणाले, श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे यांचे कर्तृत्व मोठे आहे. पर्वतीच्या वर्धापन दिनानिमित्त आज त्यांच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण पर्वतीवर झाले, ही अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची घटना आहे. आजच्याच दिवशी काका चिमाजी आप्पा पेशवे यांनी वसईचा किल्ला जिंकला. आणि आजच्याच दिवशी पुतण्या थोरले नानासाहेब पेशवे यांच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण झाले.
रमेश भागवत यांनी प्रास्ताविक केले. सुधीर पंडित यांनी आभार मानले. आदिती अत्रे यांनी सूत्रसंचालन केले.