भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम
पुणे ः
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत आयोजित ‘ बहुरूपधारिणी ‘ या सांगीतिक कार्यक्रमात शनिवारी सायंकाळी मराठी भाषेची नानाविध रूपे उलगडली आणि उपस्थित रसिकांची मने भारावून गेली ! मराठी भाषेचा प्रारंभापासून प्रवास या कार्यक्रमातून सादर केला गेला.निर्मिती,लेखन,निवेदन मराठी भाषेच्या अभ्यासक डॉ.वंदना बोकील-कुलकर्णी यांचे होते.संगीत संयोजन अनुप कुलथे यांचे होते गिरीश दातार,अभिनेत्री गौरी देशपांडे यांनी प्रभावी अभिवाचन केले.मंजिरी जोशी,प्रणव कुलकर्णी यांनी गायन केले.प्रकाश सुतार(कीबोर्ड),रोशन चांदगुडे(तबला),धनंजय साळुंखे(तालवाद्य)यांनी अनुरूप अशी साथसंगत केली.
हा कार्यक्रम शनिवार, दि.११ मे २०२४ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला .हा कार्यक्रम विनामूल्य होता.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा २०५ वा कार्यक्रम होता.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले आणि कलाकारांचा सत्कार केला.
मराठी भाषेतील पहिले ग्रंथरूप असलेल्या गाथा सप्तशती पासून चक्रधर स्वामींचे दृष्टांत पाठ, संत रचना, भारूड, लोक परंपरेत जपलेली हादग्याची गाणी, स्त्री गीते, गोंधळ, लावणी आधुनिक भावगीते आणि यांच्या बरोबर शिवकाल , उत्तर पेशवाई, आधुनिक मराठी गद्य लेखनातील मिसेस फरार, पंडिता रमाबाई, शाहू महाराज, प्रबोधनकार ठाकरे, आनंदीबाई शिर्के, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, शीलवती केतकर ,गौरी देशपांडे,मंगला गोडबोले, गदिमा, सौमित्र ,नारायण सुर्वे आणि भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्याचे वाचन असा मोठा पट आज बहुरूपधारिणी या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमातून उलगडला. प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादात हा कार्यक्रम रंगत गेला.