सुजय विखे विरुद्ध नीलेश लंके सामना
अहिल्यानगर (अहमदनगर)-दमदाटी तुमच्या घरात चालवा. सुसंस्कृत महाराष्ट्रात तुमची दमदाटी खपवून घेतली जाणार नाही असा थेट इशारा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिला आहे. ‘माझ्या नादी लागणाऱ्यांचा पुरता मी बंदोबस्त केला आहे. नीलेश लंके, तू किस झाड की पत्ती?’ अशा शब्दांत अजित पवारांनी मविआ, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार, आमदार नीलेश लंके यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावर सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिले आहे.
अहमदनगरमध्ये नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर पलटवार केला आहे. त्या म्हणाल्या, ”ते म्हणतात मी सकाळी लवकर उठतो. अहो सकाळी सगळेच लवकर उठतात. आणि दमदाटीचेही राहू द्या. कोण घाबरत नाही त्याला. आजच्या सभेत तर कुणीतरी त्यांचे भाषण चालू असतानाच समोरून ‘राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी’ अशी घोषणा दिली. दमदाटी केली तर ती सुसंस्कृत महाराष्ट्रात चालणार नाही. आम्ही ती खपवून घेणार नाही. नीलेश लंकेला जे दमदाटी करतात त्यांना मला विनम्रपणे सांगायचे आहे, दमदाटी तुमच्या घरात चालवा, बाहेर नका चालवू”, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला.
पुढे सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदी यांचे नाव न घेता अजित पवारांना टोला लगावला आहे. त्या म्हणाल्या, ”त्यांना कशाला घाबरता? हे ज्यांना घाबरतात, त्यांच्यासमोर डंके की चोटपर मी आणि अमोल कोल्हे दिल्लीत भाषणं करतो”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यांच्या या विधानानंतर टाळ्यांचा मोठा कडकडाट झाला.
दरम्यान, अहमदनगरमध्ये महायुतीकडून सुजय विखे यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. तर महाविकास आघाडीकडून नीलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नीलेश लंके यांनी अजित पवार गटातून शरद पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालण्यात आली आहे. यावरून अहमदनगरमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र आहे.