लंके ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचा मी हेडमास्तर आहे.
पारनेर:‘माझ्या नादी लागणाऱ्यांचा पुरता मी बंदोबस्त केला आहे. नीलेश लंके, तू किस झाड की पत्ती?’ अशा शब्दांत अजित पवारांनी मविआ, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार, आमदार नीलेश लंके यांच्यावर निशाणा साधला. पारनेरच्या पठार भागाला कुकडी प्रकल्पातून दोन टीएमसी पाण्याचा प्रश्न आचारसंहिता संपल्यानंतर आपण जातीने लक्ष घालून हा मार्गी लावू, असा दावाही त्यांनी केला.
महायुती, भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखेंच्या प्रचारासाठी पारनेर बाजारतळावर आयोजित सभेत अजितदादा म्हणाले की, येत्या १३ तारखेला लंकेंचे पार्सल त्यांच्या घरी पाठवा. मला इथे आल्यानंतर कळालं की महायुतीच्या कार्यकर्त्यांना दमदाटी केली जाते आहे. अधिकाऱ्यांना भरसभेत दम दिला जातो. लंके ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचा मी हेडमास्तर आहे. पारनेरकरांच्या मागणीनुसारच मी लंकेंना विधानसभेला उमेदवारी दिली होती. ती मागणी करणारेही इथे उपस्थित आहेत.
काँग्रेस-राष्ट्रवादीचे मंत्री असताना दिलेले आश्वासन पुन्हा दिले
पंचवीस वर्षांपूर्वी पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथे पाणी परिषद झाली. त्यात कुकडी प्रकल्पातील पिंपळगाव जोगे धरणातील पारनेर तालुक्याचे हक्काचे दोन टीएमसी पाणी पठार भागाला दिले जाईल, असे आश्वासन अजित पवारांनी दिले होते. त्या वेळी काँग्रेस – राष्ट्रवादी सरकारमध्ये जलसंपदामंत्री होते. तेच आश्वासन शुक्रवारी त्यांनी पुन्हा दिले.