– ॲनिमेशन क्षेत्रात तरुणांना अनेक संधी; तज्ञांचे तरुणांना मार्गदर्शन
– असिफा इंडिया संस्थेतर्फे पुण्यात आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिन साजरा
पुणे – बदलत्या काळानुसार तरुणांसमोरील आव्हाने आता बदलत आहे, त्यामुळे तरुणांनी वर्षानुवर्ष परंपरागत इंजिनिअरिंग आणि मेडिकल यांसारख्या पारंपारिक क्षेत्रांकडेच करिअर म्हणून न पाहता ॲनिमेशन, गेमिंग, विज्युअल इफेक्ट्स फाईन आर्ट्स यांच्यासारख्या नवीन वाटाही शोधायला हव्यात भविष्यकाळात ॲनिमेशन क्षेत्रामध्ये तरुणांना अनेक संधी उपलब्ध असून नवीन शैक्षणिक धोरणानुसार त्यामुळे या क्षेत्रात लाखो रोजगार निर्मिती होणार आहे, अशी माहिती असिफा इंडिया संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ॲनिमेशन क्षेत्रातील तज्ञांनी दिली.
असिफा संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिनानिमित्त पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या परिषदेमध्ये भारताच्या विविध भागातून आलेल्या तज्ञांनी ॲनिमेशन क्षेत्रातील तरुणांसाठी असणारे संधी या विषयावर मार्गदर्शन केले. फिकी ॲनिमेशन रीजवल इफेक्ट्स गेमिंगचे संचालक आशिष कुलकर्णी, फ्रेमबॉक्स ॲनिमेशनच्या उपाध्यक्षा विनिता बचानी, आसिफा इंडियाचे प्रमुख संजय खेमसरा, गॉड स्पीड गेम्स पुणे से संचालक गृहीम मुखर्जी फिल्म सीजीआय पुणेचे प्रमुख अमित भारद्वाज, इंडस्ट्रियल गेमिंग अँड मॅजिक मुंबईचे मनन देसाई, एम टू ॲनिमेशन मुंबईचे सीनियर डेव्हलपमेंट मॅनेजर सुभाजीत सरकार या तज्ञांनी या परिषदेमध्ये तरुणांना मार्गदर्शन केले.
फ्रेमबॉक्स संस्थेच्या उपाध्यक्षा विनिता बचानी म्हणाल्या गेल्या काही वर्षापर्यंत ॲनिमेशन क्षेत्र हे महिलांसाठी विशेषता तरुण मुलींसाठी नाही असा गैरसमज निर्माण झाला होता. या क्षेत्रामध्ये काम करण्याची असणारी अनिश्चितता, वेळेचे बंधन नसणे त्यामुळे तरुणी या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी इच्छुक नव्हत्या. परंतु आता मात्र अनेक ॲनिमेशन संस्था, स्टुडिओ आणि जाहिरात कंपन्या महिलांना त्यांच्या वेळेच्या सोयीनुसार काम देण्यास तयार आहे, त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून महिलांचा या क्षेत्रामध्ये येण्याचे प्रमाण वाढले आहे. पुण्यासह देशाच्या विविध भागातील ॲनिमेशन इन्स्टिट्यूट मध्ये महिलांचे प्रवेश घेण्याचे प्रमाण वाढले देखील आहे. देशाच्या अनेक विद्यापीठांमध्ये ॲनिमेशन क्षेत्रातील अभ्यासक्रमसाठी महिलांना प्राधान्य देण्यात येत आहे. ॲनिमेशन गेमिंग व्हिज्वल इफेक्ट्स, फाईन आर्ट्स यांसारख्या वेगळ्या प्रकारच्या क्षेत्रांमध्ये महिलांचे वाढणारे प्रमाण हे निश्चितच त्यांच्यासाठी आणि देशाच्या शैक्षणिक धोरणांसाठी तसेच महिलांचे ॲनिमेशन क्षेत्रातील प्रमाण वाढविण्यासाठी चांगली बाब आहे.
आशिष कुलकर्णी म्हणाले तरुणांसमोरील आव्हाने लक्षात घेता केंद्र सरकारने नुकतेच नवीन शैक्षणिक धोरण अमलात आणले आहे. या शैक्षणिक धोरणानुसार तरुणांना पारंपारिक विषयांव्यतिरिक्त त्यांच्या आवडीच्या विषयांमध्ये करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून शाळांमध्ये इयत्ता सहावी पासून विद्यार्थ्यांना ॲनिमेशन, गेमिंग, फाईन आर्ट्स यांसारख्या नवीन विषयांची ही ओळख करून देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना या विषयांची शालेय स्तरावरच माहिती होईल तसेच या क्षेत्रातील त्यांना गोडी लागण्यास मदत होईल. लहानपणापासूनच वेगळ्या क्षेत्रातील माहिती असल्यास त्यांना कॉलेज नंतर करिअरसाठी वेगळ्या संधीही उपलब्ध होऊ शकतील. त्यामुळेच नवीन शैक्षणिक धोरणामध्ये या विषयावर अधिक लक्ष देण्यात आले आहे.
संजय खेमसरा म्हणाले, असिफा या संस्थेच्या माध्यमातून तरुणांना भविष्यकाळातील संधीचा कसा लाभ घेता येऊ शकेल या संदर्भात संस्थेकडून संपूर्ण आशियामध्ये परिषद आयोजित करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिनानिमित्त परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेमध्ये ॲनिमेशन क्षेत्रातील तज्ञ विद्यार्थ्यांना भविष्यातील बदलते तंत्रज्ञान आणि संधी या संदर्भात मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा निश्चितच तरुणांना फायदा होणार असून त्यामुळे तरुणांना कॉलेज नंतर वेगळ्या संधी उपलब्ध होणार आहेत. असिफा तर्फे अनरियल या सॉफ्टवेअर कंपनीच्या सहकार्याने दरवर्षी ५० ॲनिमेशन क्षेत्रातील तंत्रज्ञांना प्रत्येकी ५००० डॉलर प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान आणि त्याची माहिती दिली जाते. त्यामुळे ॲनिमेशन क्षेत्रातील तंत्रज्ञ घडण्यास मदत होते. गेल्या अनेक वर्षांपासून या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून ॲनिमेशन क्षेत्रातील अनेक दिग्गज घडविण्यास मदत झाली आहे.
गॉड स्पीड गेम्स पुणेचे संचालक गृहीम मुखर्जी, फिल्म सीजीआय पुणेचे प्रमुख अमित भारद्वाज, इंडस्ट्रियल गेमिंग अँड मॅजिक मुंबईचे मनन देसाई, एम टू ॲनिमेशन मुंबईचे सीनियर डेव्हलपमेंट मॅनेजर सुभाजीत सरकार या तज्ञांनीही यावेळी विद्यार्थ्यांना ॲनिमेशन क्षेत्रातील भविष्यातील संधी या संदर्भात मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात ॲनिमेशन क्षेत्रातील फ्रेमबॉक्स, ऍरेना, मॅक, ट्रॉन, वेदा संस्था सहभागी झाल्या होत्या. एक्सपी पेन आणि नेट प्रोटेक्टर अँटीव्हायरस हे सहप्रायोजक होते.