अकरा वर्षानंतर निकाल लागला
पुणे-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून करणाऱ्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना पुणे विशेष न्यायालयाने जन्मठेप आणि प्रत्येकी पाच लाख रुपयांची शिक्षा सुनावली आहे. तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल सुनावला आहे.
याप्रकरणाचा तपास उच्च न्यायालायाच्या आदेशाने सीबीआयकडे सोपविण्यात आला होता. सीबीआयचे अधिकारी एस. आर. सिंग यांच्या मार्गदर्शन याप्रकरणाचा तपास करण्यात आला. विशेष न्यायालयाने तपास यंत्रणेवर ताशेरे ओढले आहेत आणि सबळ पुरावे सादर करण्यात सीबीआय अक्षम ठरल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे.
डॉ. तावडे याचा या गुन्ह्यात हेतू दिसून आलेला आहे. तसेच त्यावर संशय घेण्यासारखी परिस्थिती आहे. मात्र त्यांच्या विरोधात गुन्हा सिद्ध करण्यात पोलीस आणि सरकार पक्ष अपयशी ठरले आहेत. तर भावे आणि पुनावळेकर यांच्या विरोधात देखील सक्षम पुरावे सादर करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे या तीनही आरोपींची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे.सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी गोळीबार केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्या विरोधातील सक्षम पुरावे पोलिसांनी न्यायालयात सादर केले. त्या आधारे दोघांना शिक्षा सुनावण्यात येत आहे, असे न्यायाधीश जाधव यांनी निकालात नमूद केले आहे.
याबाबत डॉक्टर हमीद दाभोलकर म्हणाले ,न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्यामध्ये हल्लेखोरांना शिक्षा झाली आहे. मात्र या गुन्ह्यातील मास्टरमाइंड निर्दोष सुटला ही खेदाची बाब आहे. खुनासारख्या गंभीर गुन्हे व्यापक कटाचा भाग असून यात प्याद्यांना शिक्षा होती मात्र, कटाचे सूत्रधार मोकळीक मिळते असे दिसून आले आहे .अकरा वर्षानंतर या गुन्ह्याचा निकाल लागला असून या पुढील काळात देखील आमची लढाई संविधानिक मार्गाने पुढे चालूच राहणार आहे.