नंदूरबार-बारामती मध्ये झालेल्या मतदानानंतर शरद पवार हे चिंतेत असल्याचे दिसून येत आहेत. त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा करूनच काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे मन बनवले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मला वाटते चार जूनच्या निकालानंतर नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करणार असल्याचा दावा नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्यापेक्षा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत या आणि आपले स्वप्न पूर्ण करा, असे आवाहन देखील नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना केले आहे. डॉ. हीना गावित यांच्या प्रचारासाठी नंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते.
काँग्रेसने खोट्याची कंपनी उभारली आहे. ते कधी आरक्षणासाठी खोटे बोलतात तर कधी संविधानासाठी खोटे बोलतात. आरक्षणावर काँग्रेस सध्या ‘चोर मचाये शोर’ असे दिसत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. धर्माच्या आधारावर आरक्षण हे बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील नाकारले होते. त्यामुळे हे आरक्षण त्यांच्या विचारांच्या विरोधात असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. अशा पद्धतीने आरक्षण देणे म्हणजे संविधान निर्मात्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखे आहे. हे पाप कधीही माफ होणार नाही, असा आरोप देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. वंचित, गरीब आणि आदिवासी लोकांचे आरक्षण काढून घेऊन ते त्यांच्या व्होटबँकेला देण्याचा डाव असल्याचा आरोप देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
‘वंचितचा जो अधिकार, मोदी त्याचा चौकीदार’
कर्नाटकमध्ये काँग्रेसने ओबीसी समाजाचे आरक्षण काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या सरकारने एका रात्रीत कर्नाटकमध्ये मुस्लिम समाजाला ओबीसीचा दर्जा दिला. त्यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणात वाटेकरी वाढले आहे. मात्र, जो पर्यंत मोदी जिवंत आहे, तो पर्यंत कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागू देणार नसल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. ‘वंचितचा जो अधिकार, मोदी त्याचा चौकीदार’ असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी आरक्षणाच्या मुद्यावर काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला.
चौधरींचा चहा आणि मोदींनी काढली आठवण
नंदुरबार आणि गुजरात यांचा खूप जवळचा संबंध आहे. पंतप्रधान होण्याआधी देखील मी अनेकदा नंदुरबार येथे येत होतो. नंदुरबारला आलो आणि चौधरींचा चहा घेतली नाही, असे कधीच होत नाही. तुमचा चहा आणि तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमाचे कर्ज हा नरेंद्र मोदी कधीही विसरू शकत नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. वंचित आणि आदिवासी जनतेची सेवा ही माझ्यासाठी परिवारातील सदस्यांच्या सेवेप्रमाणे असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. काँग्रेसच्या शाही परिवाराप्रमाणे मी मोठ्या घरातून आलेलो नाही. मी तर गरीबी पाहिले आहे. असे देखील नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटले आहे.
आदिवासींना घर देण्याचा संकल्प
आदिवासी समाजातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. अनेकांना पक्के घर मिळाले नव्हते, इतकेच नाही तर साठ वर्षांच्या कार्यकाळात वीज देखील नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचली नव्हती. त्यामुळे प्रत्येक गरिबाला आणि आदिवासींना घर देण्याचा संकल्प आम्ही केला आहे. प्रत्येक आदिवासी समाजाला पाणी देण्याचा संकल्प आम्ही केला होता. जंगलात राहणाऱ्या आदिवासी समाजातील गावात देखील वीज पोहोचवण्याचे काम आमच्या सरकारने केला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
तिसऱ्या कार्यकाळामध्ये आपण तीन कोटी घर बांधणार
ज्या नागरिकांना अद्याप घर मिळाले नाही. ज्या नागरिकांना अद्याप नळाला पाणी मिळाले नाही. ज्या नागरिकांना अद्याप गॅस कनेक्शन मिळाले नाही. त्या नागरिकांना सांगा की, पुढच्या टर्म मध्ये त्यांना घर, गॅस कनेक्शन, वीज आणि पाणीपुरवठा नरेंद्र मोदी देणार ही गॅरंटी आहे, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी उपस्थित मतदारांना केले. तिसऱ्या कार्यकाळामध्ये आपण तीन कोटी घर बांधणार असल्याचा दावा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
आरक्षणावर काँग्रेसची अवस्था चोर मचाए शोर अशी आहे
आरक्षणाबाबत काँग्रेसची अवस्था फारच नाजूक आहे. धर्माच्या आधारे आरक्षण हे बाबासाहेबांच्या भावनेच्या विरोधात आहे. हे संविधानाच्या भावनेच्या विरुद्ध आहे, पण दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींचे आरक्षण हिसकावून त्यांच्या व्होटबँकेला देण्याचा काँग्रेसचा अजेंडा आहे.
ज्यांचा रंग भगवान कृष्णासारखा आहे, काँग्रेस त्यांना आफ्रिकन मानते
काँग्रेस राजपुत्राचे गुरू अमेरिकेत राहतात. त्यांनी भारतातील लोकांवर वर्णद्वेषी वक्तव्य केले आहे. ज्यांचा रंग भगवान श्रीकृष्णासारखा आहे त्यांना काँग्रेस आफ्रिकन मानते. त्यामुळे द्रौपदी मुर्मूजींचे राष्ट्रपती होणे त्यांना मान्य नव्हते. राजपुत्राच्या गुरूने अमेरिकेला सांगितले आहे की, राम मंदिर बांधणे आणि रामनवमी साजरी करणे हे भारताच्या कल्पनेच्या विरोधात आहे.
काँग्रेस गरिबांच्या विरोधात
काँग्रेसी लोकांमध्ये अहंकार इतका भरलेला आहे की त्यांना गरिबांची काही काळजी नाही. आज जेव्हा हा गरीबाचा मुलगा तुमचा सेवक बनून पंतप्रधान म्हणून काम करत आहे, तेव्हा या गरीब विरोधी मानसिकतेच्या आणि राजघराण्याची मानसिकता असलेल्या लोकांना ते सहन होत नाही.