हरिनामाच्या जयघोषात विठ्ठल रखुमाईला चंदनाचे लेपन
पुणे : गुलाब पाकळ्या, मोगऱ्यापासून तयार केलेल्या वस्त्रांनी खुललेले विठ्ठल रखुमाईचे मोहक रुप… वारकऱ्यांनी केलेले भजन आणि हरिनामाच्या जयघोषात प्रसन्न झालेला मंदिर परिसर…झेंडू,चाफा, लिली, गुलाब, शेवंती, अॅस्टर यांसारख्या विविधरंगी फुलांची सजावट…अशा भक्तीमय आणि सुवासिक वातावरणात टिळक चौकातील पेशवेकालीन श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर खुलून गेले होते.
विठ्ठल रखुमाईचे वासंतिक चंदन उटी पूजन यावेळी करण्यात आले. अध्यक्ष दिलीप काळभोर, कार्याध्यक्ष दिलीप बांदल, कोषाध्यक्ष दिपक थोरात, सचिव नरेंद्र गाजरे, सहसचिव बाळासाहेब ताठे, उत्सव प्रमुख महेश अंबिके, ज्येष्ठ सदस्य रमेश मणियार यावेळी उपस्थित होते. पश्चिम महाराष्ट्र वारकरी परिवारातर्फे भजन सेवा करण्यात आली. चंदनाचा लेप, फुलांची आरास व विद्युत रोषणाई नितीन राऊत व परिवार यांच्यातर्फे करण्यात आली होती.
दिपक थोरात म्हणाले, देवाला उष्णतेचा दाह होऊ नये म्हणून मोगऱ्यासह विविध फुलांची आरास करुन वासंतिक चंदन उटी लेपन मूर्तीला करण्यात येते. यावेळी ५० हून अधिक प्रकारच्या फुलांचा वापर मंदिराच्या सजावटीमध्ये करण्यात आला.
श्री लकडी पूल विठ्ठल मंदिराचा जिर्णोद्धार तसेच मंदिर परिसरातील श्री नवग्रह मंदिर व श्री काळभैरव मंदिर यांचा दगडी सभा मंडप करण्याचा संकल्प विश्वस्त मंडळाने आज केला. प्रसिद्ध शिल्पकार प्रशांत खेडकर यांची या कामासाठी नियुक्ती करण्यात आली. विठ्ठल मंदिराच्या कळसाचे काम देखील यामध्ये करण्यात येणार आहे, असेही थोरात यांनी सांगितले.