ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन
पुणे, दि. ८ मे २०२४ : लोककल्याण व समाजाभिमुख कामांसाठी मनाशी केलेला निश्चय व ध्यास पूर्ण करण्याची जिद्द ठेवली तर सकारात्मक परिवर्तन वेगाने होऊ शकते याचा प्रत्यय महावितरणचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्या गेल्या दीड वर्षाच्या कार्यकाळात आला आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
येथील आडकर फाऊंडेशनच्या वतीने मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांना ‘जिद्द जीवन गौरव’ पुरस्कार डॉ. सबनीस यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. पत्रकार भवनामध्ये शुक्रवारी (दि. ३) आयोजित या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आडकर फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, महाराष्ट्र आर्थिक महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन इटकर, ज्ञान फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोहर कोलते यांची प्रमुख उपस्थिती होती.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सबनीस म्हणाले, मुख्य अभियंता श्री. पवार यांची जिद्द ही सेवाभावी आहे. सरकारी क्षेत्रातील इमानदारी व कर्तव्यनिष्ठेसोबतच त्यांनी सामाजिक बांधिलकीचे नाते जपले आहे. वीजक्षेत्रात सेवा देण्यासाठी पुणे परिमंडलातील साडेपाच हजार कर्मचाऱ्यांच्या सांघिक शक्तीला श्री. पवार यांनी सकारात्मक वेग दिला आहे. त्यामुळे वर्षभरापूर्वी त्यांनी जाहीर केलेल्या वीजक्षेत्रातील ‘पुणे व्हिजन २०५०’च्या आराखड्यातील कामे वेगवानपणे सुरू झाल्याची खात्री पटली आहे. ग्राहकसेवेच्या ध्येयासाठी जिद्दीने कार्यरत असणाऱ्या मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांचा ‘पवार पॅटर्न’ महावितरणमध्ये आदर्श ठरावा अशा सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी मुख्य अभियंता श्री. पवार यांनी मागील दिड वर्षांमध्ये पुणे परिमंडलामध्ये झालेल्या विविध कामांची माहिती दिली. ते म्हणाले, वीजग्राहकांना तत्पर व दर्जेदार सेवा देणे व कंपनीचे सर्वतोपरी हित साधणे हा माझा ध्यास आहे. वीजसेवेसाठी परिस्थिती सदैव अनुकूल असते असे नाही. मात्र सांघिक शक्तीने अधिक सकारात्मक व पारदर्शकतेने आम्ही सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे. सोबतच पुणे परिमंडलातील भविष्याचा वेध घेत ग्राहकसेवा व वाढीव विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी नवीन उपविभाग, शाखा कार्यालये, नवीन अतिउच्चदाब व उच्चदाबाचे उपकेंद्रे तसेच सर्व वर्गवारीतील ग्राहकांसाठी नवीन वीजयंत्रणा उभारण्यास सुरवात केल्याची माहिती त्यांनी दिली.
या कार्यक्रमात ॲड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविकातून जिद्द जीवनगौरव पुरस्कारामागील भूमिका विशद केली. ते म्हणाले, जिद्द माणसाला शून्यातून उच्च ध्येयाकडे घेऊन जाते. अशीच वाटचाल मुख्य अभियंता श्री. पवार यांची असून या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा गौरव करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी श्री. सचिन इटकर व श्री. मनोहर कोलते यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन आणि सन्मानपत्राचे वाचन शिल्पा देशपांडे यांनी केले.