पुणे: बारामती लोकसभा मतदार संघासाठी मतदान प्रक्रियेला सकाळी सुरुवात झाली. त्यानंतर काही वेळातच इंदापूरचे आमदार दत्ता भरणे यांनी बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी एक्सवर प्रसिध्द केल्याने एकच खळबळ उडाली. याची माहिती मिळताच उमेदवार सुप्रिया सुळे यांनी दत्ता भरणे यांच्या विरोधात सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
दत्ता भरणे यांचा एक व्हिडिओ एक्सवर व्हायरल झाला आहे. यामध्ये ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ व दम भरताना पाहायला मिळत आहेत. हा व्हिडिओ इंदापूर मधील एका गावातील आहे. या व्हिडिओमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातच्या कार्यकर्त्यांना ते दमदाटी करताना पाहायला मिळत आहेत. सहानंतर तुम्हाला कोण विचारणार असा प्रश्न विचारत त्यांच्याकडून दमदाटी केली जात आहे. एक आमदाराने अशा प्रकारची दमदाटी केल्याने त्यांच्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. हा व्हिडिओ रोहित पवारांनी ”एक्स”वर प्रसिध्द करुन, केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडीओत बघा. विशेष म्हणजे, ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा बलुतेदारांपैकी एक आहेत. ही चिडचिड खूप काही सांगून जाते. पण आजच्या लढाईत स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दपडशाहीला भीक घालणार नाही. असे लिहून भरणे यांच्या वागणूकीवर संताप व्यक्त करुन टीका केली आहे. असे असले तरी रोहित पवार यांनी एक्सवर प्रसिध्द केलेला व्हिडिओ कधीचा आणि कुठला आहे, याबाबत अद्याप काहीही समोर आलेले नाही. मात्र, हा व्हिडिओ आजचा असून मतदारांना धमकावले जात असल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे.